महिला बालविकास योजनांचा ” ऑनफिल्ड ग्राउंड रिपोर्ट ” घ्यायला सुरुवात

जि.प. सभापती अनुराधा नारकर यांचा जिल्ह्याभरात आढावा दौरा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या महिला व बालविकास समिती सभापती अनुराधा महेशकुमार नारकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी तसेच अंगणवाडी केंद्रांची पाहणी आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्याभरात तालुकानिहाय दौऱ्याचे नियोजन केले आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाच्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी,

अंगणवाडी केंद्रांची स्थिती आणि संबंधित कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात या दौऱ्याचे वेळापत्रक नमूद करण्यात आले आहे. महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेणे, अंगणवाडी केंद्रांची पाहणी करणे तसेच बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेण्याच्या उद्देशाने हा तालुकानिहाय दौरा आयोजित करण्यात आला आहे.

या नियोजनानुसार 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सावंतवाडी येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयाचा 25 ऑगस्ट रोजी कुडाळ येथील कार्यालयाचा सभापती सौ. नारकर यांनी आढावा घेतला. 27 ऑगस्ट रोजी दोडामार्ग, तर 28 ऑगस्ट रोजी वेंगुर्ला येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी मालवण, 4 सप्टेंबर रोजी देवगड, 8 सप्टेंबर रोजी कणकवली आणि 9 सप्टेंबर रोजी वैभववाडी येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयांना भेट देऊन कामकाजाची पाहणी करण्यात येणार आहे. सर्व दौरे सकाळी 11 वाजता नियोजित करण्यात आले आहेत.

दौऱ्यादरम्यान संबंधित तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार असून, ज्या दिवशी संबंधित तालुक्याचा आढावा घेण्यात येणार आहे, त्या तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त दोन किंवा तीन अंगणवाडी केंद्रांची तपासणी करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या तपासणीची नोंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.तसेच तपासणीच्या वेळी संबंधित कार्यक्षेत्रातील सरपंच, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांना पूर्वकल्पना देऊन उपस्थित राहण्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत पत्र पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित पर्यवेक्षिका व इतर कर्मचाऱ्यांनीही या पाहणीवेळी उपस्थित राहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

या दौऱ्याच्या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांमध्ये महिला व बालविकास विभागाच्या योजनांची अंमलबजावणी कशी होत आहे, लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे का, तसेच बाल विकास प्रकल्प कार्यालयांचे कामकाज आणि क्षेत्रीय पातळीवरील यंत्रणेची कार्यक्षमता यांचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे या तालुकानिहाय पाहणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद स्तरावरून संबंधित तालुक्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका तसेच इतर संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देऊन बैठकीस आवश्यक माहिती व अहवालासह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महिला व बालविकास समितीच्या या तालुकानिहाय दौऱ्यामुळे अंगणवाडी व बालविकास योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्यास मदत होणार आहे.

error: Content is protected !!