चौके साळेल परिसरातील चिरेखाणीनजीक घडली घटना
गंभीर वार केल्याने क्लीनर युवकाची प्रकृती गंभीर
चौके (प्रतिनिधी) : साळेल चौके परिसरात चिरेखाण व्यवसाय सुरू असलेल्या परिसरात कोल्हापूर गडहिंग्लज निलजी येथील चिरे भरण्यासाठी आलेल्या ट्रक वरील क्लीनर मानदेश निगोडा पाटील या युवकाने मंगळवार दिनांक सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास चिरेखाणी नजीक ट्रक उभे असलेल्या ठिकाणी चाकूने स्वतःच्या मानेवर व पोटावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या युवकाला तत्काळ प्राथमिक उपचार करण्यासाठी चौके प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने ओरस जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवारी सकाळी चिरे वाहतूक करणारा ट्रक नेहमीप्रमाणे मालवण तालुक्यातील साळेल परिसरातील चिरेखाणीवर चिरे भरण्यासाठी आला असता ट्रक चालकासोबत आलेल्या दुसऱ्या ट्रक वरील क्लीनर ने चिरेखाणीपासून काही अंतरावर असलेल्या ठिकाणी आपल्या सोबत आणलेल्या धारदार चाकूने स्वतःच्या मानेवर व पोटावर गंभीर वार केले. गंभीर जखमी झालेल्या क्लीनरला येथील कामगार व ग्रामस्थांनी चौके प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी साईली मिठारी यांनी प्राथमिक विचार करत शरीरावर झालेल्या खोलवर जखमा यामुळे या युवकाला पुढील उपचारासाठी ओरस जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या युवकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यामागचे कारण समजले नसून या सर्व घटनेचा पुढील तपास मालवण पोलीस करत आहेत.











