कै. सुमित्रा सखाराम पाताडे यांच्या स्मरणार्थ नामदेव पाताडे यांचा कौतुकास्पद उपक्रम
आचरा (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या शारीरिक विकासाला आणि क्रीडा क्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने समाजातील दातृत्वशील व्यक्तींनी पुढाकार घेणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. याच सामाजिक बांधिलकीतून कै. सुमित्रा सखाराम पाताडे यांच्या स्मरणार्थ नामदेव सखाराम पाताडे यांच्या वतीने जिल्हा परिषद शाळा चिंदर नं. १ मधील सर्व विद्यार्थी व शिक्षकांना स्पोर्टस् गणवेशाचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होताना त्यांना एकसमान आणि आकर्षक गणवेश उपलब्ध झाला आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
या कार्यक्रमास पोलीस पाटील दिनेश पाताडे, रावजी तावडे, सुनील पाताडे, जान्हवी घाडी, वेदिका घाडी, गिरीश पवार, नंदकुमार जुदळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्रप्रसाद गाड आदी उपस्थित होते.
कै. सुमित्रा सखाराम पाताडे यांच्या स्मरणार्थ राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल प्रशाला व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने नामदेव सखाराम पाताडे यांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र कुबल यांनी केले, तर आभार सचिन तवटे यांनी मानले.












