अशोक नारकरांच्या सेवाभावी उपक्रमाला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवलीत ५७ रक्तदात्यांनी केले रक्तदान; सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) : वाढदिवस म्हटला की उत्सव, शुभेच्छा आणि आनंदाचा सोहळा डोळ्यांसमोर येतो. मात्र, आपल्या वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याची प्रेरणादायी परंपरा वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचे क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी अशोक नारकर यांनी जपली. त्यांच्या ५६व्या वाढदिवसानिमित्त अशोक नारकर मित्रपरिवार, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान शाखा कणकवली आणि उपजिल्हा रुग्णालय कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल ५७ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ. विद्याधर तायशेट्ये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत अशोक नारकर यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. वाढदिवसाच्या निमित्ताने गरजू रुग्णांना जीवनदान देणाऱ्या रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करणे ही समाजाप्रती असलेली जाणीव आणि बांधिलकी दर्शविणारी बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

रक्तदानासाठी नागरिक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रक्तदानामुळे अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे, प्रसूतीदरम्यान रक्ताची गरज भासणारे तसेच विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा आधार मिळतो. त्यामुळे अशा उपक्रमांमधून समाजात रक्तदानाविषयी जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असल्याचेही उपस्थितांनी नमूद केले.

यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, कणकवली पंचायत समितीचे उपसभापती सोनू सावंत, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडुलकर, शिक्षक नेते शरद नारकर, उद्योजक सुनील नारकर, डॉ. धनंजय रासम, उदय शिरोडकर, उद्योजक संजय पाताडे, आसावरी नारकर, एन्जॉय ग्रुपचे प्रवीण म्हापणकर, सुशील परब, गणेश शिरकर, दत्तगुरू गावकर, केशव पावसकर, यशवंत भोसले, राजन चव्हाण तसेच प्रणाली म्हापणकर, उज्वला नारकर, सायली परब, विद्या शिरोडकर, दीपा गावकर आदी उपस्थित होते.

या रक्तदान शिबिरासाठी नवजीवन ब्लड बँकेचे मोलाचेया00 सहकार्य लाभले. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिबिर यशस्वी झाले. स्वतःच्या वाढदिवसाचा आनंद केवळ वैयक्तिक उत्सवापुरता मर्यादित न ठेवता रक्तदानाच्या माध्यमातून समाजातील गरजूंसाठी उपयुक्त ठरविणाऱ्या अशोक नारकर मित्रपरिवाराच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!