वैभववाडी (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्यालय उंबर्डेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सदाशिव ढगे (वय ६६) यांचे सोमवारी सकाळी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.
मूळ गाव निगवे खालसा, ता. करवीर, जि. कोल्हापूर येथील रहिवासी असलेले दत्तात्रय ढगे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘डी. एस. ढगे’ या नावाने परिचित होते. त्यांनी माध्यमिक विद्यालय उंबर्डे येथे तब्बल ३३ वर्षे सहाय्यक शिक्षक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर तीन वर्षे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत राहून सन २०१८ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना शिक्षक संघटनेचा अध्यक्ष मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाला होता. तसेच त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. माध्यमिक अध्यापक पतपेढीचे संचालक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.
शिक्षण क्षेत्राबरोबरच पत्रकारिता क्षेत्रातही डी. एस. ढगे यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. गेली अनेक वर्षे ते दैनिक पुढारीचे पत्रकार म्हणून कार्यरत होते. वैभववाडी तालुका पत्रकार समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. तसेच ते जिल्हा पत्रकार संघाचे सदस्यही होते.
त्यांच्या निधनाने एक अभ्यासू शिक्षक, कुशल प्रशासक आणि निर्भीड पत्रकार हरपल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, मुलगा, सून, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आहे.












