पोलीस ठाणे, महावितरण, प्राथमिक आरोग्य केंद्र व पोस्ट कार्यालयाला भेट; कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन उत्साहात
आचरा (प्रतिनिधी) : आजच्या २१व्या शतकातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विविध क्षेत्रांतील प्रत्यक्ष अनुभव व कुतूहलपूर्ण माहिती मिळणे आवश्यक आहे. याच उद्देशाने जि. प. पू. प्रा. शाळा चिंदर अपराजकोंडच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रभेटींचे आयोजन करण्यात आले. या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांनी पोलीस ठाणे, महावितरण, प्राथमिक आरोग्य केंद्र व पोस्ट कार्यालयाला भेट देऊन विविध कार्यपद्धतींची प्रत्यक्ष माहिती घेतली.
आचरा पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्था, पोलिसांचे कार्य, नागरिकांची सुरक्षितता आणि कायद्याचे महत्त्व याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे करत त्यांना राखी बांधली.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, आचरा येथे भेट दिली. वरिष्ठ यंत्रचालक विनोद गराटे तसेच श्रीकांत कोमुरलेकर (तंत्रज्ञ, बाह्यस्रोत कर्मचारी) यांनी विद्यार्थ्यांना वीज निर्मिती, वीज वितरण व्यवस्था, वीज बचत, विद्युत सुरक्षेचे नियम तसेच महावितरण विभागाचे कार्य याबाबत प्रत्यक्ष माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, आचरा येथे डॉ. जुवेरिया मुजावर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा, स्वच्छता, प्राथमिक उपचार, रुग्णालयातील विविध विभागांचे कार्य तसेच आरोग्यविषयक जनजागृती याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी श्रीमती डी. एस. पोवळे (आरोग्य सेविका) व श्रीमती पाटील (आरोग्य सहाय्यिका) उपस्थित होत्या.
आचरा पोस्ट कार्यालयास भेट देऊन विद्यार्थ्यांनी पोस्टामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध सेवांची माहिती घेतली. पत्रव्यवहार, पार्सल, स्पीड पोस्ट, बचत खाते, मनीऑर्डर आदी सेवांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
चारही क्षेत्रभेटींमध्ये संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत केले. विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधन साजरे करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. विठ्ठल गोपाळ साळकर (तंत्रज्ञ, बाह्यस्रोत कर्मचारी) यांनी विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी बाबासो सिसाळ व उपशिक्षिका वैशाली रायसिंग चव्हाण यांनी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचे विशेष आभार मानले. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांचा प्रत्यक्ष अनुभव देणारी ही क्षेत्रभेट त्यांच्या ज्ञानात व सामाजिक जाणीवेत भर घालणारी ठरली.










