कणकवली (प्रतिनिधी) : रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून गरजू रुग्णासाठी जीवनदान ठरते. हीच मानवतेची भावना मनात ठेवून कुंदे गावचे रहिवासी सुशिल अर्जुन परब यांनी रक्तदानाच्या सेवेत सातत्यपूर्ण योगदान दिले आहे. ३० ऑगस्ट २०२६ रोजी त्यांनी आपल्या आयुष्यातील ३० वे रक्तदान पूर्ण केले.
सुशिल परब यांनी २०१७ पासून रक्तदानाच्या सेवेत स्वतःला झोकून दिले असून, दरवर्षी साधारण चार वेळा रक्तदान करण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण सेवेमुळे अनेक गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.
सुशिल परब हे उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे ICTC समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या शासकीय सेवेसोबतच सामाजिक बांधिलकी जपत ते रक्तदान चळवळीत सक्रियपणे योगदान देत आहेत. तसेच ते सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान, शाखा कणकवलीचे सचिव म्हणूनही कार्यरत आहेत.
३० ऑगस्ट रोजी अशोक नारकर यांच्या पुढाकाराने आयोजित रक्तदान शिबिराच्या आयोजन व नियोजनासाठी नवजीवन रक्तपेढी, कणकवली यांच्या वतीने सुशिल परब यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या रक्तदानातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने सर्वाधिक वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
रक्तदानातून समाजसेवेचा वसा जपत ‘रक्तदान करा, जीवन वाचवा’ हा संदेश आपल्या कृतीतून देणारे सुशिल परब हे युवकांसह समाजातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत. त्यांची ३० रक्तदानांची वाटचाल ही केवळ आकडा नसून मानवतेच्या सेवेला वाहिलेली प्रेरणादायी कहाणी आहे.











