पालकमंत्री नितेश राणे यांच्या विकासकामांवर जिल्ह्यातील जनता समाधानी
सुधीर नकाशे व सिद्धेश रावराणे यांचा पलटवार
वैभववाडी (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे हे केवळ वैभववाडी तालुक्याचाच नव्हे, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करत आहेत. त्यांच्या कामाची व कार्यपद्धतीची ख्याती संपूर्ण राज्यात आहे. त्यामुळे नाईक बंधूंनी स्टंटबाजीसाठी लोक जमा करून मोर्चे काढण्याऐवजी प्रथम आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन भाजपचे वैभववाडी तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले.
उबाठा शिवसेनेच्या वतीने बुधवारी वैभववाडीत स्मार्ट मीटर सक्ती व वाढत्या महागाईविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांनी वैभववाडी तालुक्याला वाळीत टाकल्याची टीका केली होती. या टीकेला भाजप तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे व पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.यावेळी प्राची तावडे,दिगंबर पाटील, प्रकाश पाटील, शिवाजी राणे, अतुल सरवटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नकाशे पुढे म्हणाले, महागाईविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार नाईक बंधूंना नाही. त्यांच्या अडीच वर्षांच्या आघाडी सरकारच्या काळातील परिस्थितीचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकाळातील जिल्ह्यातील विकासकामे आणि आघाडी सरकारच्या काळातील विकास यांची तुलना जनतेने करावी.
वैभववाडी तालुक्यात वीज वितरण विभागासह विविध शासकीय यंत्रणांमध्ये आवश्यक अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रयत्न केले आहेत. वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील यंत्रणा सक्षम करण्यात आली असून, येथे डायलिसिसची सुविधाही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी लोक जमा करून मोर्चा काढण्याचा केविलवाणा प्रयत्न नाईक बंधूंनी करू नये, असा आरोप नकाशे यांनी केला.
सभापती सिद्धेश रावराणे म्हणाले, ज्यांना स्वतःच्या पक्षानेच वाळीत टाकले आहे, त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावर टीका करणे हास्यास्पद आहे. अनेकदा मुंबईला जाऊन मोठे नेतेपद मिळविण्याचे प्रयत्न केले जातात; मात्र शेवटी जिल्हाप्रमुख पदावरच बोळवण केली जाते, अशी खोचक टीका त्यांनी माजी आमदार वैभव नाईक यांचे नाव न घेता केली.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून वैभववाडी तालुक्याचा सर्वांगीण विकास सुरू आहे. तालुक्याला त्यांच्यासारखे सक्षम नेतृत्व लाभले असून, त्यामुळे वैभववाडीच्या विकासाची चिंता नाईक बंधूंनी करू नये, असेही रावराणे यांनी स्पष्ट केले.
स्मार्ट मीटरच्या प्रश्नावर बोलताना रावराणे म्हणाले, आम्ही जनतेच्या प्रश्नांपासून दूर नाही. वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसारख्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर जनतेची दिशाभूल करू नये. वैभववाडी तालुका पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुशांत नाईक हे अपघाताने नगरसेवक झाले असून, त्यामागेही राणेची भूमिका होती, असा दावा करत रावराणे यांनी त्यांच्यावर टीका केली. नाईक यांनी पालकमंत्र्यांवर टीका करण्याऐवजी आपल्या नगरपंचायतीच्या कारभाराकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील यंत्रणा अधिक सक्षम करण्यात आली असून, आवश्यक अधिकारी व कर्मचारी उपलब्ध आहेत. त्यामुळे टीका करणाऱ्या नाईक बंधूंनी एकदा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन पाहावे असा टोलाही रावराणे यांनी लगावला.










