खा. नारायण राणे व ना. नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

मुंबई-सावंतवाडी नवी नियमित एक्सप्रेस रेल्वे सुरू; कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण

नाम.एकनाथ शिंदे, नाम.राहुल नार्वेकर, नाम.नितेश राणे,महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत रेल्वेला दाखविला हिरवा झेंडा

मुंबई (प्रतिनिधी) : कोकणवासियांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या नियमित एक्सप्रेस ट्रेनला आजपासून औपचारिक सुरुवात झाली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत या नव्या रेल्वेसेवेला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नांमुळेच कोकणवासियांची ही दीर्घकालीन मागणी मार्गी लागली आहे. या नव्या गाडीमुळे मुंबई आणि कोकणादरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना, विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या शुभारंभप्रसंगी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मत्स्य व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि महापौर रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ही नवी रेल्वेसेवा आता दररोज प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या नावाने ही ट्रेन धावेल. प्रवाशांच्या सोयीसाठी या एक्सप्रेसला मुख्य मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. यामध्ये दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांचा समावेश आहे.

मुंबई आणि कोकणादरम्यान ही नियमित रेल्वेसेवा उपलब्ध झाल्याने रोजचा प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थी, व्यावसायिक आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. गणेशोत्सव, सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता या नियमित सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर आणि आरामदायी होणार आहे. यासोबतच कोकणातील पर्यटन क्षेत्राला मोठी गती मिळून स्थानिक आर्थिक विकासालाही उत्तम चालना मिळेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

error: Content is protected !!