‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा; इन्सुली, मडुरा यांना विभागून द्वितीय
ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ‘गोकुळ’ यांच्या प्रायोजकत्वातून आयोजित जिल्हास्तरीय ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धेत बांदा पंचक्रोशी सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्था मर्यादित, बांदा हिने प्रथम क्रमांक पटकावला. इन्सुली आणि मडुरा येथील संस्थांना विभागून द्वितीय, तर घावनळे आणि वर्दे येथील संस्थांना विभागून तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक व्हिक्टर डांटस, महेश सारंग, नीता राणे, रविंद्र मडगावकर, भागीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर आदी उपस्थित होते.
स्पर्धेत बांदा पंचक्रोशी सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्था मर्यादित, बांदा (ता. सावंतवाडी) हिला प्रथम क्रमांक मिळाला. इन्सुली सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्था मर्यादित, इन्सुली आणि श्री देवी माऊली सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्था मर्यादित, मडुरा (ता. सावंतवाडी) यांना विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला. मयूर दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था, घावनळे आणि यशोदा दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित, वर्दे (ता. कुडाळ) यांना विभागून तृतीय क्रमांक मिळाला. विकास संस्थांच्या गटातून श्री सातेरी प्रासादिक विकास संस्था, वेतोरे (ता. वेंगुर्ला) हिची उत्तेजनार्थ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
प्रथम क्रमांकाच्या संस्थेला ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३० हजार, तृतीय क्रमांकासाठी २० हजार आणि उत्तेजनार्थ १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. विभागून आलेल्या क्रमांकांची पारितोषिक रक्कमही विभागून दिली जाणार आहे.
जिल्ह्यात सुमारे १४१ दूध संस्था दूध संकलनाचे काम करीत असून, त्यापैकी ३० हून अधिक संस्थांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. विविध निकषांनुसार सहभागी संस्थांची तपासणी करून अंतिम निवड करण्यात आली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सर्व दूध संस्थांचा मेळावा घेऊन विजेत्या संस्थांना पारितोषिके वस्तूरूप किंवा साहित्य स्वरूपात तसेच प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
“दूध संकलन वाढविण्यासाठी संस्था मोठी मेहनत घेत आहेत. चांगले काम करणाऱ्या संस्थांचे कौतुक व्हावे आणि इतर संस्थांनाही प्रेरणा मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.”










