मनीष दळवी : क्लस्टरनिहाय नियोजन; शेतकऱ्यांच्या दारीच कर्जाची ‘वन विंडो’
ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात दुग्ध व्यवसायाला व्यापक स्वरूप देण्यासाठी पुढील एका वर्षात तीन हजारांहून अधिक दुभती जनावरे जिल्ह्यात आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी क्लस्टरनिहाय शेतकऱ्यांची निवड, बँकेकडून गावपातळीवर ‘वन विंडो’ कर्ज प्रक्रिया, दूध संकलनाचे निश्चित रूट आणि कोल्हापूरच्या धर्तीवर जिल्ह्यातच दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीचे केंद्र उभारण्याचा कृती आराखडा तयार केला आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक व्हिक्टर डांटस, महेश सारंग, नीता राणे, रविंद्र मडगावकर, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर आदी उपस्थित होते.
दळवी म्हणाले, की जिल्हा बँक, ‘गोकुळ’, जिल्हा परिषद आणि भागीरथ प्रतिष्ठान या यंत्रणांनी मागील चार वर्षांत दुग्ध व्यवसाय वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले. त्याचे परिणाम दूध उत्पादन आणि संकलनातील वाढीत दिसू लागले आहेत. आता या चळवळीला आणखी वेग देण्यासाठी पुढील वर्षभराचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे.
पहिल्याच टप्प्यात ३०० नोंदणी
आराखड्याच्या पहिल्या टप्प्यात ३०० हून अधिक दुभत्या जनावरांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. दुग्ध व्यवसायासाठी क्षमता असलेली क्लस्टर निश्चित केली जात असून, बँकेचे अधिकारी थेट संबंधित क्लस्टरमध्ये जाऊन इच्छुक शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे एकाच ठिकाणी पूर्ण करणार आहेत. शेतकऱ्यांना कागदपत्रांसाठी वारंवार बँकेत हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी बँकेचे अधिकारी ठराविक दिवशी संबंधित भागातच बसतील. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, कर्ज प्रस्ताव आणि योजनांचा लाभ यासाठी ‘वन विंडो’ पद्धतीने प्रक्रिया केली जाणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.
दूध दोन-अडीच तासांत चिलिंग सेंटरला
क्लस्टर निश्चित करताना केवळ शेतकऱ्यांची संख्या अथवा जनावरांची उपलब्धता न पाहता दूध संकलनाची वाहतूकही विचारात घेतली जाणार आहे. पहिल्या संकलन केंद्रापासून शेवटच्या केंद्रापर्यंत दूध घेत ते चिलिंग सेंटरला पोहोचण्यासाठी दोन ते अडीच तासांपेक्षा जास्त वेळ लागू नये, अशा पद्धतीने स्वतंत्र दूध संकलन रूट निश्चित केले जाणार आहेत. या रूटच्या परिसरातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. त्यामुळे नव्याने निर्माण होणारे उत्पादन बाजार व्यवस्थेशी थेट जोडले जाईल, असे दळवी यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातच होणार जनावरांची खरेदी
‘गोकुळ’ने कोल्हापूर जिल्ह्यात दुभत्या जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी दोन केंद्रे उभारली आहेत. राज्याबाहेरून तेथे जनावरे आणली जातात आणि शेतकरी प्रत्यक्ष जनावरे पाहून, त्यांची खात्री करून खरेदी करू शकतात. याच धर्तीवर सिंधुदुर्गातही केंद्र सुरू करण्याची विनंती ‘गोकुळ’ला करण्यात आली असून, ती मान्य करण्यात आली आहे, असे दळवी यांनी सांगितले. हे केंद्र सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना दुभती जनावरे निवडण्यासाठी परजिल्ह्यात किंवा राज्याबाहेर जावे लागणार नाही. दर्जेदार जनावरे जिल्ह्यातच उपलब्ध झाल्याने नवीन शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायात प्रवेश करणेही सुलभ होईल.
‘श्वेतक्रांती’चे लक्ष्य
दळवी म्हणाले, ‘‘जिल्ह्यात नवीन पशुधन आणणे एवढाच आमचा उद्देश नाही. दूध उत्पादन वाढले पाहिजे, त्याच्या संकलनाची खात्रीशीर यंत्रणा निर्माण झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना या व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळाले पाहिजे. तीन हजारांहून अधिक दुभती जनावरे जिल्ह्यात आणून सिंधुदुर्गात दुग्धक्रांती, अर्थात श्वेतक्रांती उभी करण्याचा प्रयत्न आहे.’’
चार यंत्रणांची सांगड
दुग्ध व्यवसाय वाढीसाठी जिल्हा बँकेमार्फत वित्तपुरवठा, ‘गोकुळ’मार्फत दूध संकलन व बाजारपेठ, जिल्हा परिषदेकडून आवश्यक योजनांची जोड आणि भागीरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण अशी विविध यंत्रणांची सांगड घालण्यावर भर दिला जाणार आहे. पुढील वर्षभरात क्लस्टरनिहाय नियोजन पूर्ण करून टप्प्याटप्प्याने पशुधन वाढविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.










