मद्यप्राशन करून वाहन चालविल्याच्या आरोपातून निर्दोष

ओरोस न्यायालयाचा निकाल; पुरेसा सबळ पुरावा सादर करण्यात सरकारी पक्ष अपयशी

ओरोस (प्रतिनिधी) : मद्यप्राशन करून वाहन चालविल्याच्या आरोपातून अमित गणपत गोसावी यांची सिंधुदुर्गनगरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी ए. जी. देशिंगकर यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ठोस व सबळ पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात सरकारी पक्षाला यश आले नसल्याने न्यायालयाने हा निकाल दिला.

पडवे येथील एसएसपीएम हॉस्पिटल परिसरात १२ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या मोटार अपघातप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात मोटार अपघात रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली होती. तपासादरम्यान गोसावी यांनी मद्यप्राशन करून वाहन चालविल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात प्रकरण दाखल केले होते.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून विविध साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, आरोपीविरुद्ध आरोप सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला ठोस व सबळ पुरावा न्यायालयासमोर सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला यश आले नाही. त्यामुळे न्यायालयाने गोसावी यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अॅड. अशपाक शेख यांनी मुख्य काम पाहिले. त्यांना अॅड. नामदेव मठकर, अॅड. पराग नांदकर, अॅड. शिवानी जुवेकर, अॅड. पंकज खरवडे, अॅड. विनय रजपूत, अॅड. कैस शेख, अॅड. भूषण कदम आणि अॅड. हरेश वरवडेकर यांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!