सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
बांदा (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांदा–दाणोली मार्गावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता खड्डेमुक्त करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य हेमंत दाभोलकर व प्रशांत बांदेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने आजपासून या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.
गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक तसेच वाहनांची ये-जा वाढणार असल्याने बांदा–दाणोली मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याबाबत संबंधित विभागाकडे तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती.काम सुरू झाल्यानंतर गुरु कल्याणकर, प्रशांत बांदेकर व हेमंत दाभोलकर,उपसरपंच रत्नाकर आगलावे, भाजपा बांदा युवा शहराध्यक्ष विकी कदम, सौरभ आगलावे, ग्रामपंचायत सदस्य तनुजा वराडकर यांच्यासह अन्य नागरीक यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. तसेच खड्डे योग्य पद्धतीने बुजविले जात आहेत की नाही, याकडे जातीने लक्ष देत काम करून घेतले.
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याने वाहनचालक व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.











