ग्रामपंचायत तरंदळेच्या पाठपुराव्याला यश; महावितरणकडून तातडीने कामे पूर्ण

कणकवली (प्रतिनिधी) : गेल्या अनेक महिन्यांपासून तरंदळे गावातील वीजवाहिन्या, खांब तसेच ट्रान्सफॉर्मर संदर्भात निर्माण झालेल्या विविध समस्यांची तरंदळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून महावितरणच्या निदर्शनास आणून दिली होती. ग्रामपंचायतीने वेळोवेळी केलेल्या लेखी पत्रव्यवहाराला अखेर यश आले असून महावितरणकडून गावातील विविध वीजविषयक कामे तातडीने हाती घेऊन पूर्ण करण्यात आली आहेत. काही कामे सध्या अंतिम टप्प्यात असून लवकरच तीही पूर्ण होणार आहेत. याबद्दल महावितरण चे कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे यांचा तरंदळे सरपंच सुशील कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ग्रामपंचायतीने गावातील वीज समस्या सोडविण्यासाठी महावितरणकडे केलेल्या मागण्यांची तातडीने दखल घेण्यात आली. त्यानुसार गावातील वीजवाहिन्यांची दुरुस्ती व देखभाल, नवीन वीज खांब बसविणे, ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढविणे तसेच कमकुवत वीजवाहिन्यांचे नूतनीकरण अशी विविध कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना वारंवार भेडसावणाऱ्या वीज समस्यांपासून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

या कामांबद्दल महावितरणचे आभार मानण्यासाठी ग्रामपंचायत तरंदळेच्या वतीने कणकवली येथील महावितरण कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यकारी अभियंता जयंतिलाल भामरे, उपकार्यकारी अभियंता संतोष पालवे, उपकार्यकारी अभियंता सचिन राऊत तसेच सहाय्यक अभियंता रोशन तिरपुडे उपस्थित होते.

यावेळी कार्यकारी अभियंता जयंतिलाल भामरे यांनी तरंदळे गावाच्या विकासासाठी आणि वीज समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महावितरण कटिबद्ध असल्याचे सांगितले. ग्रामपंचायतीने केलेला पाठपुरावा कौतुकास्पद असून उर्वरित कामेही लवकरात लवकर पूर्ण केली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सरपंच सुशिल विजय कदम यांनी यावेळी बोलताना, केवळ पत्र देऊन न थांबता सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे गावातील वीजविषयक कामे मार्गी लागल्याचे सांगितले. भामरे, पालवे, राऊत आणि तिरपुडे या अधिकाऱ्यांनी गावातील समस्या समजून घेत त्या तातडीने सोडविल्याबद्दल संपूर्ण तरंदळे गावाच्या वतीने त्यांनी आभार व्यक्त केले. तसेच महावितरण आणि ग्रामपंचायत यांच्यातील समन्वय यापुढेही कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तरंदळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महावितरणकडून करण्यात आलेली ही कामे महत्त्वपूर्ण ठरणार असून, वीजपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे. ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!