कृष्णजन्मोत्सव सोहळ्यात फोंडाघाट पंचक्रोशी दशावतारी कलाकार यांच्या अभिनय – कौशल्याचे कौतुक !
फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : सध्या बाजारपेठेतील राधाकृष्ण मंदिरात,कृष्ण जन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, फोंडाघाट पंचक्रोशीतील दशावतारी कलाकार आणि सहकलाकार यांनी एकत्र येत, महान ऐतिहासिक नाट्य प्रयोग “महारथी कर्ण” सादर केला. या नाट्याला सजग प्रेक्षक प्रभाकर मेजारी,आणि समस्त दशावतारी नाट्यप्रेमींनी उपस्थित राहून उदंड प्रोत्साहन दिले. एकीकडे लोककला लोप पावत चालली असताना, पंचक्रोशीतील जुने जाणते कलाकार आणि सध्याचे युवा यांचा सहभाग दशावताराला नवा आयाम देणारा ठरला. याचे रसिकांनी कौतूक केले..
कुंती पुत्र महापराक्रमी कर्णच्या जीवनातील संघर्ष, गुरु परशुरामाच्या शापामुळे आणि कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या प्रसंगात कर्ण ची अगतिकता अन शेवट यावर आधारित महारथी कर्ण नाट्यप्रयोगातील व्यक्तिरेखा प्रत्येक कलाकाराने जिवंत केली. सर्व जवळ असूनही कर्ण ची वेदना, उद्वेग ,पराक्रम आणि भावना यांचा संगम याला उपस्थितांनी दाद दिली. या नाटकात अश्विन लाड (गणपती), संजय चव्हाण – प्रकाश लाड (रिद्धी /सिद्धी), रवींद्र सुतार (दुर्योधन) साहिल शिरोडकर (दु:शासन- वृषसेन) गिरीश लिंग्रस (कर्ण), रामदास सामंत (शकुनी-अर्जुन), अभिमन्यू लाड (कुंती), अमेय साटम (कृष्ण), गौरेश पांचाळ (शैल्य), अजित लाड (धर्म), रोहित राणे (वृषाली) यांनी आपापली अदाकारी सादर केली. या नाट्यप्रयोगाला हार्मोनियम- अनंत तळेकर, पखवाज-
धाकू मेस्त्री- मिलिंद लाड, तर झांज – अशोक लाड यांनी समर्थ साथ दिली. स्थानिक कलाकार व प्रेक्षक रसिकांनी रात्री उशिरापर्यंत नाटकाचा आस्वाद घेतला…











