ग्रामस्थानी वाचला समस्यांचा पाडा
खारेपाटण – मुंबई बंद असलेली एस टी गाडी पुन्हा सुरू करावी -ग्रामस्थांची मागणी
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य परिवहन विभागीय वाहतूक नियंत्रक प्रमुख (DC) श्री दीपक घोडे यांनी नुकतीच खारेपाटण येथील एस टी बस स्थानकाला भेट देऊन त्याची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासमवेत कणकवली एस टी डेपोचे आगार प्रमुख निलेश लाड हे देखील उपस्थित होते.या भेटी दरम्यान ग्रामस्थांनी एसटीशी निगडित असलेल्या विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थानी अक्षरशः अनियमित एस टी च्या फेऱ्यांचा तसेच बंद करण्यात आलेल्या एस टी गाड्यांचा आणि विविध समस्यांचा पाडाच एस टी च्या प्रमुख अधिकाऱ्यांसमोर वाचला.
यावेळी खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघाच्या सदस्य सौ प्राची ईसवलकर माजी जि.प सदस्य श्री रवींद्र उर्फ बाळा जठार,खारेपाटण सरपंच श्री महेंद्र गुरव,माजी सरपंच इस्माईल मुकादम, कोर्ले सरपंच श्री विश्वनाथ खानविलकर, सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर,खारेपाटण ग्रा.पं. सदस्य श्री सुधार ढेकणे,जयदीप देसाई, किरण कर्ले,खारेपाटण हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री संजय सानप लिपिक श्री तेजस झगडे,रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री शेखर शिंदे व पदाधिकारी संतोष तुरळकर,शिवाजी राऊत तसेच खारेपाटण एस टी बस स्थानक वाहतूक नियंत्रक प्रमुख श्रीशेष राऊत आदी मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
खारेपाटण जि.प.सदस्य प्राची ईसवलकर यांच्या मागणी वरून एस टी महामंडळाचे डी सी दीपक घोडे हे खारेपाटण एस टी बसस्थानकला भेट देण्यासाठी शुक्रवार दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी सायं.४.०० वा.खारेपाटण येथे आले होते.यावेळी त्यांनी खारेपाटण बस स्थानकातील शौचालयाची पाहणी करून तेथील समस्या जाणून घेतली. तसेच बस स्थानक आवारातील रिक्षा चालक व्यवसायाकासाठी योग्य जागा निश्चित करून त्यांना स्थानिक ग्रामपंचायतीच्या मदतीने सहकार्य केले असे सांगितले.याबरोबरच येथील स्थानिक प्रवाशांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय येथे झालेल्या डी सी यांच्या मीटिंग मध्ये ग्रामस्थानी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत अनियमित व बंद असलेल्या एस टी फेऱ्याबाबत जाब विचारला.
“मी आपल्या समस्या जाणू शकतो परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सुमारे ३०० पेक्षा अधिक चालक व वाहक या कर्मचाऱ्याची कमतरता असल्याने एखादी नवीन गाडी सुरू करताना कर्मचारी उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे.”
— श्री दीपक घोडे
सिं.जि.रा.प.विभाग प्रमुख
यावेळी खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांनी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण एस टी बस स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी देण्यात येणाऱ्या एस टी गाड्या ह्या जुन्या न देता चांगल्या व सुव्यवस्थित देण्याची मागणी केली तर जि.प.सदस्य सौ प्राची ईसवलकर यांनी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी महिला व ज्येष्ठ नागरिकांना सध्य स्थितीत असलेल्या एस टी गाड्यांमधून गर्दी अभावी अक्षरश उभ्याने प्रवास करावा लागतो.याकरिता खारेपाटण - तळेरे - कणकवली या मार्गावर दर एका तासाने शटल गाडी सुरू करण्यात यावी अशी मागणी केली.तर कोर्ले सरपंच विश्वनाथ खानविलकर यांनी खारेपाटण - पोंभुर्ले - मणचे या मार्गावर प्रवासी भार नियमन चांगले असताना देखील येथे एस टी नेहमीच उशीरा येत असते.याचा फटका शालेय विद्यार्थी व नागरिकांना बसतो.त्यामुळे या मार्गावर एस टी गाड्या वेळेत सोडण्यात याव्यात तसेच वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अजून एखादी गाडी या मार्गावर सुरू करण्यात यावी अशी मागणी केली.
खारेपाटण – मुंबई सेंट्रल गाडी सुरू करण्यात यावी
"खारेपाटण सह आजूबाजूच्या सुमारे ४० गावांतील प्रवासी नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी वरदान ठरलेली खारेपाटण - मुबई ही एस टी गाडी संबंधित प्रवाशांना कोणतीही पूर्व सूचना न देता सुमारे १५ वर्षे पासून बंद करण्यात आली आहे.त्यामुळे येथील दशक्रोषातील नागरिकांना आपल्या हक्काच्या असलेल्या एस टी गाडीला मुकावे लागले आहे.परिणामी लोक खाजगी वाहनाने मुंबईला जात आहेत.तर दशक्रोषातील प्रवासी नागरिकांच्या भावनांचा व मागणीचा एस टी महामंडळाने गभिर्याने विचार करून बंद असलेली खारेपाटण - मुंबई सेंट्रल एस टी गाडी खारेपाटण एस टी बसस्थानकातून पूर्ववत सुरू करावी."
-- श्री संतोष पाटणकर
यावेळी ग्रामस्थानी विविध एस टी गाड्यांचा समस्या डी सी समोर मांडल्या.
१ मालवण – मुंबई एस टी गाडी खारेपाटण बस स्थानकात आणावी शिवशाही रद्द करावी.
२ सिंधुदुर्ग येथून खारेपाटण करून रत्नागिरीकडे जाणाऱ्या बहुतांश बंद केलेल्या एस टी गाड्या पुन्हा सुरू कराव्यात
३ खारेपाटण एस टी बसस्थानकात ऑनलाइन रिझर्वेश सेवा तत्काळ उपलब्ध करून द्यावी.
४ शालेय विद्यार्थांना त्रासदायक ठरणाऱ्या भुईबावडा,प्रिंदावन, शेर्पे,पोंभुर्ले या मार्गावरील एस टी
गाड्या वेळेत सोडाव्यात.
५ खारेपाटण एस टी बस स्थानक ते खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन एस टी गाडी सुरू करावी.
६ सर्व जलद एस टी गाड्या खारेपाटण एस टी बस स्थानकात याव्यात.










