‘इनलँड व्हेसल्स ॲक्ट’नुसार निवतीचा समावेश ‘झोन-२’मध्ये करा; जाचक नियमांमुळे भूमिपुत्रांच्या रोजगारावर गदा आणू नका – विष्णू मोंडकर
मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हंगामाला सुरुवात होत असतानाच निवती लाईट हाऊस व ‘म्हातारीची चूळ’ परिसरातील जलसफरीच्या बोटींवर महाराष्ट्र सागरी मंडळाकडून (MMB) इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग (IRS) नोंदणीची अट घालण्यात आल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या पर्यटन व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने निवती लाईट हाऊस परिसराचा ‘Inland Vessels Act 2021’ अंतर्गत ‘झोन-२’मध्ये समावेश करावा, अशी मागणी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केली आहे.
मालवण बंदर, तारकर्ली, देवबाग व वेंगुर्ला-निवती परिसरातून निवती लाईट हाऊसपर्यंतची सागरी सफर पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरली आहे. मात्र, बंदर निरीक्षकांच्या परिपत्रकानुसार निवती लाईट हाऊस किनाऱ्यापासून सुमारे ५.२९ नॉटिकल मैल म्हणजेच जवळपास ९.८ किलोमीटर अंतरावर असल्याने IV Act अंतर्गत नोंदणीकृत बोटींना निश्चित इनलँड व्हेसल मर्यादेबाहेर जाण्यास निर्बंध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या जलसफरीसाठी Merchant Shipping Act अंतर्गत IRS नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे.
मात्र, महासंघाने या भूमिकेला आक्षेप घेत ‘तांत्रिक अडचणींचा सरळ मार्ग म्हणून IRSची सक्ती करण्याऐवजी स्थानिक परिस्थितीचा विचार करावा’, अशी भूमिका घेतली आहे. केंद्राच्या Inland Vessels Act 2021 अंतर्गत राज्य शासन व संबंधित प्रशासनाला समुद्राची लाटांची तीव्रता, भौगोलिक परिस्थिती व जलक्षेत्राचे स्वरूप लक्षात घेऊन विविध झोन निश्चित करण्याची तरतूद असल्याचा दावा महासंघाने केला आहे. त्यानुसार निवती लाईट हाऊस परिसराचा ‘झोन-२’मध्ये समावेश केल्यास स्थानिक पर्यटन बोटींना आवश्यक सुरक्षा निकषांसह कायदेशीर चौकटीत जलसफर करता येईल, असे महासंघाचे म्हणणे आहे.
लाखोंची IRS नोंदणी स्थानिक व्यावसायिकांना परवडणार कशी?
IRS नोंदणीची प्रक्रिया लहान व स्थानिक पर्यटन बोट व्यावसायिकांसाठी आर्थिकदृष्ट्या मोठी अडचण ठरू शकते. ही अट कायम राहिल्यास मालवण, दांडी, तारकर्ली, देवबाग व निवती परिसरातील अनेक स्थानिक व्यावसायिकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती महासंघाने व्यक्त केली आहे.
“पर्यटकांची सुरक्षा ही आमचीही पहिली प्राथमिकता आहे. सुरक्षेच्या कोणत्याही नियमाशी तडजोड केली जाणार नाही. झोन-२ अंतर्गत आवश्यक असलेली VHF रेडिओ संच, लाइफ राफ्ट, पुरेसे लाइफ जॅकेट, GPS यंत्रणा, नेव्हिगेशन लाईट्स यांसह सर्व आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यास आम्ही तयार आहोत,” असे विष्णू मोंडकर यांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधींवर पूर्ण विश्वास
या प्रश्नावर पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर हे स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या हिताचा निर्णय घेतील, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे.
“लोकप्रतिनिधी नेहमीच स्थानिक भूमिपुत्र आणि पर्यटन व्यावसायिकांच्या पाठीशी राहिले आहेत. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी चुकीचे अथवा जाचक नियम लादून जिल्ह्यातील पर्यटनास पोषक वातावरण दूषित करू नये,” असा इशारा विष्णू मोंडकर यांनी दिला.
अधिकाऱ्यांनी व्यावसायिकांना विश्वासात घ्यावे
सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने जलपर्यटनाशी संबंधित निर्णय घेताना प्रशासनाने स्थानिक व्यावसायिकांशी चर्चा करून मार्ग काढावा, अशी मागणी महासंघाने केली आहे. ५.२९ नॉटिकल मैलांच्या अंतराचा प्रश्न Inland Vessels Act 2021 मधील तरतुदींनुसार सोडवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
लवकरच पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून जलक्रीडा नौका चालक व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. निवती लाईट हाऊस परिसराचा झोन-२मध्ये समावेश करण्याचा अधिकार MMBकडे नसल्यास त्याबाबतचा प्रस्ताव तातडीने राज्य शासनाकडे पाठवावा, अशीही मागणी महासंघाने केली आहे.
“पर्यटकांच्या सुरक्षेशी तडजोड न करता स्थानिक भूमिपुत्रांचा पारंपरिक रोजगार टिकवणे आवश्यक आहे. पर्यटन व्यवसायाला चालना देणाऱ्या सकारात्मक शासनाच्या भूमिकेशी अधिकाऱ्यांनीही सकारात्मक राहावे,” असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केले आहे.

विष्णू मोंडकर










