विद्यार्थी बनले शिक्षक अन् अनुभवली ‘गुरु’ची जबाबदारी!
न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटमध्ये शिक्षक दिन उत्साहात !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अर्थात शिक्षक दिन, न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
शिक्षक दिनानिमित्त इयत्ता दहावी ‘अ’, ‘ब’, ‘क’ तसेच बारावीच्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी एक दिवसासाठी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, लिपिक व शिपाई अशा विविध भूमिका पार पाडत शालेय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. माध्यमिक विभागात मुख्याध्यापक म्हणून हर्षिका दशरथ बोरकर व यशोदा अनिल भोगले, तर पर्यवेक्षक म्हणून जय प्रसाद देसाई यांनी जबाबदारी सांभाळली. ज्युनियर कॉलेज विभागात प्राचार्य म्हणून तेजस पारकर व पर्यवेक्षक म्हणून वेदांत भोगटे यांनी काम पाहिले.
शालेय दिवसाची सुरुवात मुख्याध्यापक प्र. कृ. पारकर यांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी विद्यार्थी- शिक्षकांचा गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन अभिनंदन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडताना अध्यापन, शिस्त, नियोजन,व्यवस्थापनातील आव्हानांचा अनुभव घेतला. या उपक्रमामुळे शिक्षकांची जबाबदारी आणि कार्याचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजल्याचे विद्यार्थ्यांनी मनोगतात सांगितले…
या कार्यक्रम प्रसंगी श्री.नारिंगकर व श्री. राठोड यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक प्र. कृ. पारकर यांनी शिक्षक हा समाजाची भावी पिढी घडविणारा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मी मेस्त्री यांनी केले, तर पेडणेकरसर यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांच्या भविष्यात जबाबदारीची जाणीव करणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.









