संस्थेच्या आर्थिक उन्नतीत सभासदांचा मोलाचा वाटा – नसीरभाई काझी
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण सारख्या एका ग्रामीण भागातील सहकारी संस्था अल्पावधी कालावधीत आपले कार्यक्षेत्र जिल्हाभर पसरवून सहकार खऱ्या अर्थाने शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे अमूल्य असे कार्य करत असून संस्थेच्या आजपर्यंतच्या वाढत्या आर्थिक उन्नतीत संस्थेच्या सभासदांचा मोलाचा वाटा असल्याचे भावपूर्ण उदगार संस्थेचे चेअरमन नसीरभाई काझी यांनी प.पू भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदान मार्गदर्शन करताना काढले.
प. पू भालचंद्र महाराज नागरी सहकारी पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच रविवार दि.६ सुटेंबर २०२६ रोजी शेठ न. म. विद्यालय खारेपाटणच्या सभागृहात अध्यक्ष नासीरभाई काझी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन राजेंद्र ब्रम्हदंडे, संचालक प्रवीण लोकरे, संतोष पाटणकर, श्रध्दा देसाई, संतोष हरयाण, परवेज पटेल, नंदकिशोर कोरगावकर, राजेश वारंगे, राजेंद्र वरुणकर, मनस्वी कोळसुलकर, भावेश कर्ले, संकेत शेट्ये, तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यलक्षी संचालक शुभम मोरे, संस्थेच्या खारेपाटण शाखेचे शाखा व्यवस्थापक विजय बागवे, कणकवली शाखेचे व्यवस्थापक गणेश जामसंडेकर, संस्था कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी प. पू भालचंद्र महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सुरवात करण्यात आली. यावेळी संस्थेच्या गुणवंत कर्मचाऱ्यांचा तसेच संचालकांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये संस्थेच्या लिपीक कदम व शिपाई अनिकेत कांबळे यांचा शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तर संस्थेचे संचालक प्रवीण लोकरे यांची खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी तर राजेंद्र वरुणकर यांची विश्वस्त म्हणून निवड झाल्याबद्दल पत संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या सभेमध्ये संस्थेच्या “एकत्रित धोरण संहिता (policy manual) “सर्वानुमते मान्यता देण्यात आली. तसेच संस्थेच्या सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षासाठी संस्थेच्या सभासदांना १० % लाभांश जाहीर करण्यात आला. याचे उपस्थित सर्व सभासदानी स्वागत करून संस्थेचे आभार व्यक्त केले.
यावेळी संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण दशक्रोशीच्या परिसरातील सुमारे ५० ते ६० गावांची खारेपाटण तालुका व्हावा. या मागणीचे स्वागत करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन खारेपाटण तालुका करण्यात यावा. असा सर्वानुमते एकमुखी ठराव मंजूर केला. यावेळी उपस्थित सभासदांनी खारेपाटण तालुका झालाच पाहिजे. अशा घोषणा घोषणा देऊन सभागृहाचे लक्ष वेधले. या संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम मोरे यांनी केले तर आभार खारेपाटण शाखाधिकारी विजय बागवे यांनी मानले. शेवटी राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.













