राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय कणकवली व सावंतवाडी येथील मोफत सिटीस्कॅन सुविधा बंद करण्यात आली आहे. संबंधित कंपनीला शासनाकडून देयक न मिळाल्याने बंद झालेली ही सिटीस्कॅन सुविधा लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.
याबाबत तात्काळ कार्यवाही करून येथे आठवड्यात ही सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल अशी आश्वासन श्रीमती पवार यांनी यावेळी दिले.
गोवा दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्री नाईक यांनी भेट घेऊन हे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड या कंपनीमार्फत वर्षभरापासून मोफत सिटीस्कॅन सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. या सुविधेचा जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला चांगल्या प्रकारे फायदा होत होता. मात्र आरोग्य विभागाकडून सदर कंपनीला एक्स-रे सिटीस्कॅन एम.आर.आय अशा राज्यभरात पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांपोटी संबंधित कंपनीला राज्य सरकारकडून सुमारे 56 कोटी रुपये येणे बाकी आहे. यामुळे कंपनीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोफत सिटीस्कॅन सुविधा बंद केली आहे. परिणामी जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला यामुळे भुर्दंड सहन करावा लागत आहे.
आपण या संदर्भात आरोग्यमंत्र्यांशी बोलून कंपनीला काही रक्कम अदा करण्याबाबत कार्यवाही झाल्यास जिल्ह्यातील कणकवली व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील मोफत सिटीस्कॅन सुविधा सुरू होण्यास मदत होणार आहे. या संदर्भात सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनीही आरोग्यमंत्र्यांना पत्र दिलेले आहे. तरी आपल्याकडून त्याबाबत कार्यवाही व्हावी अशी मागणी करण्यात आली.












