वायंगणी पुलावर ओव्हरलोड डंपरचा थरारक अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली!

पुलाचा कठडा तुटला, डंपरची मागील दोन्ही चाके निखळली; ओव्हरलोड व भरधाव डंपरवर कठोर कारवाईची मागणी

वायंगणी उपसरपंच ॲड. समृद्धी आसोलकर आक्रमक; आचरा पोलिस ठाण्यात FIR दाखल, जनआंदोलनाचा इशारा

आचरा (प्रतिनिधी) : वायंगणी नाका येथे वाळूने भरलेल्या ओव्हरलोड डंपरचा भीषण अपघात सोमवार, ७ सप्टेंबर रोजी सकाळी घडला. भरधाव वेगाने तसेच क्षमतेपेक्षा अधिक वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा वायंगणी पुलावर अपघात होऊन पुलाचा कठडा तुटला, तर अपघाताची तिव्रता एवढी होती की, डंपरची मागील दोन्ही चाके निखळून पडली. स्थानिक ग्रामस्थ, रिक्षाचालक यांनी धाव घेत संबंधित डंपर चालकाचे प्राण वाचवले, सुदैवाने या थरारक अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वाळू वाहतूक करणारे डंपर क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून भरधाव वेगाने धावत असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच शालेय विद्यार्थी याच मार्गावरून एसटीने शाळेत जाण्यासाठी निघाले होते. त्यामुळे त्याच वेळी हा अपघात झाला असता तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती.

या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, नियमांचे उल्लंघन करून ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

या अपघाताची गंभीर दखल घेत वायंगणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच ॲड. समृद्धी आसोलकर यांनी संबंधित डंपर चालकाविरोधात आचरा पोलिस ठाण्यात FIR दाखल केली आहे. नियमबाह्य वाळू वाहतूक, ओव्हरलोड तसेच भरधाव वेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

“ओव्हरलोड वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित डंपर चालकांवर तातडीने कठोर कारवाई करावी. अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा उपसरपंच ॲड. समृद्धी आसोलकर यांनी दिला.

दरम्यान, या अपघातामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी, ओव्हरलोडवर नियंत्रण आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

error: Content is protected !!