दातृत्वातून गुणवत्तेला प्रोत्साहन; प्रभुतेंडोलकर बक्षिस योजनेतून गुणवंतांचा गौरव

साळगाव (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देत त्यांच्या यशाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव येथे कै. अच्युत रघुनाथ प्रभुतेंडोलकर यांच्या स्मरणार्थ सुरू असलेल्या बक्षिस योजनेचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या योजनेअंतर्गत इयत्ता ५ वी ते १२ वीमध्ये प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला बिबवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजाराम सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ झाराप पंचक्रोशी साळगावचे संस्था सचिव प्रदीप प्रभुतेंडोलकर, संस्था उपाध्यक्ष भास्कर परब, संस्था संचालक सतीश साळगावकर, देवेंद्र प्रभुतेंडोलकर, तुकाराम गोडे, माजी विद्यार्थी सुखानंद हळदणकर, दीपा सावंत, निलेश सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना दीपा सावंत यांनी आजचे युग हे स्पर्धेचे असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच स्वतःच्या क्षमतांचा विकास करण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले. प्रभुतेंडोलकर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सुरू ठेवलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून, त्यांच्या दातृत्वाबद्दल त्यांनी मनस्वी आभार व्यक्त केले. संस्था सचिव प्रदीप प्रभुतेंडोलकर यांनी आपल्या मनोगतात दिलीप प्रभुतेंडोलकर यांच्या दातृत्वाचा विशेष गौरव केला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने मदतीचा हात पुढे करणे ही समाजाप्रती असलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव आहे, असे त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे राजाराम सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “मेहनत, जिद्द आणि चिकाटी या त्रिसूत्रीचा अवलंब करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशी स्पर्धा करा आणि आपल्यातील सर्वोत्तम गुण बाहेर काढण्याचा प्रयत्न करा,” असे आवाहन केले. प्रभुतेंडोलकर कुटुंबीयांप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही भविष्यात समाजाला देणारे बनावे, असा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच शालेय शिस्त आणि ज्येष्ठ व्यक्तींबद्दल आदरभाव जपण्याचा संदेशही त्यांनी दिला.

यावेळी कु. तनया हरमलकर, कु. निमिषा सावंत, कुमार संकेत सावंत, कु. आराध्या धुरी, कु. सृष्टी सावंत, कु. अंतरा वारंग व कु. त्रिशा घाग आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून बक्षिस योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात संस्थेच्या वतीने बक्षिस योजनेचे दाते व झाराप येथील प्रतिष्ठित उद्योजक दिलीप प्रभुतेंडोलकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुणे राजाराम सावंत यांचाही सहृदय सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय मुख्याध्यापक सलीम तकीलदार यांनी केले. सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक परशुराम नार्वेकर, बक्षिसवाचन सहाय्यक शिक्षक काशिनाथ बागेवाडी, तर आभार सहाय्यक शिक्षिका वृषाली सावंत यांनी मानले.

error: Content is protected !!