फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे अझोला उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना पशुधनासाठी पूरक हिरवा चारा म्हणून उपयुक्त असलेल्या अझोलाची शास्त्रीय पद्धतीने निर्मिती, संगोपन व वापर याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.
प्रात्यक्षिकामध्ये ६ × ६ फूट आकारमान व १ फूट खोलीचा अझोला बेड तयार करण्यात आला. बेडमध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये ५ किलो माती व ३ किलो शेणखत यांचे मिश्रण करून कार्बनयुक्त माध्यम तयार करण्यात आले. त्यानंतर अझोला संस्कृती टाकून बेड अंशतः सावलीत ठेवण्यात आला. पाण्याची योग्य पातळी राखणे, तण व इतर अशुद्ध घटकांपासून बेड स्वच्छ ठेवणे तसेच अझोलाच्या वाढीचे नियमित निरीक्षण करण्याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. पुरेशी वाढ झाल्यानंतर प्लास्टिकच्या चाळणीद्वारे अझोलाची काढणी करून स्वच्छ पाण्याने धुऊन पशुधनाला पूरक खाद्य म्हणून वापरण्याची पद्धतही दाखवून देण्यात आली.
या उपक्रमाचे मार्गदर्शन कृषी संशोधन केंद्र, फोंडाघाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये वेदांत घाग,करण बन्ने, रीशल मस्केरेन्हस, स्वयंभू प्रभुदेसाई, प्रतिक चौधरी, सिद्धांत शिंदे, आर्यन सावळे, निखिल नागर, आदित्य प्रभुदेसाई व आशिम कुमार महंती यांनी सहभाग घेतला.











