ओसरगाव (प्रतिनिधी) : ओसरगाव गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र पुंडलिक देसाई यांची निवड करण्यात आली. गावातील सलोखा, शांतता आणि सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने तंटामुक्ती समितीची भूमिका महत्त्वाची असून, देसाई यांच्या निवडीमुळे गावातील विविध प्रश्न सामोपचाराने सोडविण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
या निवडीप्रसंगी ओसरगावच्या सरपंच सुप्रिया कदम, उपसरपंच गुरुदास सावंत, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष प्रदीप तळेकर, राहुल आंगणे, सुदर्शन नाईक, ग्रामपंचायत अधिकारी युवराज बोराडे, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र पुंडलिक देसाई यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गावातील नागरिकांमध्ये बंधुभाव व सलोखा निर्माण करणे, किरकोळ वादविवाद सामोपचाराने मिटविणे तसेच सामाजिक एकोपा मजबूत करण्यासाठी तंटामुक्ती समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.











