खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील कोर्ले या गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी या गावचे रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते सचिन कृष्णा कोर्लेकर यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आली असून त्यांच्यावर गावातील शांतता व सलोखा राखण्याची जबाबदारी पुन्हा एकदा गावाने दिली आहे.त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या कोर्ले ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ही निवड सर्वानुमते करण्यात आली. सरपंच विश्वनाथ खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या ग्रामसभेस ग्रामपंचायत अधिकारी निलेश पाताडे,उपसरपंच सुनील कांबळे, ग्रामपंचायत सदस्य शर्मिला बेळनेकर,माजी उपसरपंच बापू घाडी,अंगणवाडी सेविका सुरभी जांभेकर,आशा स्वयंसेविका सुकृती जैतापकर,दीपक कांबळे, जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ व २ चे शिक्षक सोपान गवळी व स्वप्निल पाटील,माजी तंटामुक्ती अध्यक्ष अजय भिसे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
सचिन कोर्लेकर हे बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या १२ गाव संघटनेचे सचिव म्हणून काम करत असून युनिक अकॅडमी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करत असतात तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक आंदोलनात त्यांचा सहभाग असतो.कोर्ले गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी कोर्लेकर यांची पुन्हा निवड होणे हे त्यांच्या कार्यावर ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे. गावातील विविध प्रश्नांवर संवादातून तोडगा काढणे, वाद टाळणे आणि ग्रामस्थांमध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी आगामी काळात समितीच्या माध्यमातून अधिक प्रभावी काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. “गावात वाद नको, संवाद हवा; तंटे नकोत, सलोखा हवा” या भावनेतून कोर्ले गावात शांतता आणि सामाजिक एकोपा अधिक मजबूत करण्यासाठी तंटामुक्ती समिती कार्यरत राहणार आहे.
सचिन कोर्लेकर यांच्या फेरनिवडीबद्दल ग्रामस्थांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सचिन कोर्लेकर












