नालासोपारा (पूर्व ) येथे “वर्षावास” निमित

बौद्ध लेणी व संवर्धन विषयावर व्याख्यान संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : बौद्धजन पंचायत समिती गट क्रमांक ३६ अंतर्गत शाखा समन्वय समिती आणि बौद्धाचार्य संघ, यांच्या संयुक्त विद्यमाने “वर्षावास प्रवचन” मालिकेतील दुसरे पुष्प रविवार दि ६/९/२०२६ रोजी सायं ७ वा. दुबे हॉल, नालासोपारा (पूर्व) येथे पार पडले. हा कार्यक्रम बौ .पं. समिती गट क्रमांक ३६ चे गट प्रतिनिधी आयु अजितभाऊ खांबे यांच्या उपस्थितीत आणि समन्यव समिती चे अध्यक्ष आयु. किशोर खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वय समितीचे सरचिटणीस कमलाकर जाधव यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयु. प्रफुल्ल पुरळकर यांनी ‘लेणी संवाद – कोकणातील अपरिचित लेण्यांशी’ या विषयावर व्याख्यान देऊन श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले.

आपल्या व्याख्यानातून प्रफुल्ल पुरळकर यांनी कोकणातील परिचित तसेच अपरिचित बौद्ध लेण्या, प्राचीन व्यापारी मार्ग, सागरी व्यापार आणि लेण्यांचे ऐतिहासिक महत्त्व यावर प्रकाश टाकला. पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध लेण्यांची माहिती देताना त्यांनी या लेण्यांचा प्राचीन व्यापारी व दळणवळणाच्या मार्गांशी असलेला संबंध स्पष्ट केला. विशेषतः अलिबागजवळील चौल येथील वाघजाई देवी लेणी मंदिर, हिंगुलजा देवी लेणी मंदिर तसेच उरण परिसरातील लेण्यांची माहिती देताना चौलचे प्राचीन व्यापारी व सागरी महत्त्व, विविध ऐतिहासिक कालखंड आणि व्यापारमार्गांच्या अनुषंगाने लेण्यांची झालेली निर्मिती याविषयी त्यांनी सविस्तर विवेचन केले.
या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून कोकणातील अनेक अपरिचित लेण्या, त्यांचा इतिहास, बौद्ध वारसा आणि सांस्कृतिक महत्त्व यांची उपस्थितांना नव्याने ओळख झाली. लेणी केवळ धार्मिक स्थळे नसून त्या प्राचीन समाजजीवन, व्यापार, प्रवास आणि सांस्कृतिक देवाण घेवाणीच्या महत्त्वपूर्ण साक्षीदार आहेत, हा दृष्टिकोन पुरळकर यांनी आपल्या मांडणीतून अधोरेखित केला.

या कार्यक्रमाकरिता सर्व शाखा, बौद्धाचार्य संघ आणि समन्वय समितीचे प्रमुख संघटक अशोक कांबळे-शेर्पेकर , मंगेश मर्चंडे , सुरेश कांबळे – ऐणारकर, आशिष शिर्के, बौद्धाचार्य मोरे आदींनी विशेष परिश्रम घेतले

error: Content is protected !!