गोवंश वाहतुकीप्रकरणी प्रमोद रावराणे आक्रमक

जिल्हा पोलिस अधीक्षकांची घेणार भेट; दोषींवर मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : भुईबावडा घाटमार्गे सुरू असलेल्या गोवंश तस्करीविरोधात जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे आक्रमक झाले आहेत. गोरक्षकांनी पकडून दिलेल्या वाहनांप्रकरणी केवळ वाहनचालकांवर कारवाई न करता गोवंश तस्करीच्या मागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात यावा. तसेच त्याला साथ देणारे शासकीय अधिकारी-कर्मचारी, दलाल आणि वाहनचालक यांच्यासह संपूर्ण साखळीचा तपास करून दोषींवर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आपण जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन करणार असल्याचे प्रमोद रावराणे यांनी सांगितले.

भुईबावडा घाटमार्गे गोवंशाची वाहतूक होत असल्याचा आरोप असून, गोरक्षकांनी यापूर्वी काही वाहने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत. आज पहाटेही गोरक्षकांनी गोवंश वाहतूक करणारी दोन वाहने पकडली. या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रावराणे यांनी केली आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपींचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तसेच मोबाईल लोकेशन तपासण्यात यावे, अशी मागणीही ते पोलिस अधीक्षकांकडे करणार आहेत. गोवंश तस्करीत कोणाचा कोणाशी संपर्क होता, त्यामागे कोणाचे जाळे कार्यरत आहे, याचा तपास सीडीआर आणि लोकेशनच्या माध्यमातून होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या गंभीर विषयाबाबत जिल्ह्याच्या प्राणी क्लेश समितीचीही आज भेट घेऊन हा संपूर्ण प्रकार समितीसमोर मांडणार असल्याचे रावराणे यांनी सांगितले. गोवंश वाहतुकीच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

error: Content is protected !!