एस.टी. बसमध्ये चढताना चोरट्याचा डाव; बसस्थानकात सीसीटीव्ही नसल्याने तपासाला अडथळा
वैभववाडी (प्रतिनिधी) : आठवडा बाजाराच्या दिवशी एस.टी. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ हिसकावून पलायन केल्याची घटना बुधवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास वैभववाडी बसस्थानकात घडली. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात खळबळ उडाली असून, बसस्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याने चोरट्याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.
बुधवारी वैभववाडीचा आठवडा बाजार असल्याने बाजारपेठेसह बसस्थानक परिसरात मोठी गर्दी होती. दुपारी एक वाजता सुटणारी सडुरे-शिराळे एस.टी. बस बसस्थानकात दाखल झाली होती. प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी गर्दी करत असताना शिराळे येथील वयोवृद्ध महिला जयवंती तुकाराम पाटील याही बसमध्ये चढत होत्या. याचवेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने पाठीमागून त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ खेचली. माळ खेचल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून मदतीसाठी धावा केला. मात्र, बसमध्ये चढण्याच्या गडबडीत असल्याने त्यावेळी त्यांच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. या संधीचा फायदा घेत चोरट्याने घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी तत्काळ बसस्थानकात धाव घेतली. पोलिसांनी जयवंती पाटील यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. तसेच चोरट्याचा माग काढण्यासाठी वैभववाडी बाजारपेठेपासून फोंडा बाजारपेठेपर्यंत परिसरात गस्त घालत संशयितांचा शोध घेतला. मात्र, पोलिसांच्या हाती संशयित लागला नाही.
सीसीटीव्हीअभावी सुरक्षेचा प्रश्न.
वैभववाडी बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने चोरीसारख्या घटनांमध्ये तपास करताना पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे दाखल होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात वैभववाडी बाजारपेठ, बसस्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी मोठी वर्दळ वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बसस्थानक व बाजारपेठ परिसरात तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तसेच आठवडा बाजाराच्या दिवशी गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.












