वडिलांची पोलीस ठाण्यात धाव, मुलाविरुद्ध फिर्याद दाखल
कणकवली (प्रतिनिधी) : वडिलांच्या बँक खात्यातून त्यांच्या संमतीशिवाय एटीएमद्वारे २ लाख ४९ हजार रुपये परस्पर काढल्याप्रकरणी मुलगा रविंद्र विजय चिंदरकर (वय ४८, मूळ रा कलमठ गावडेवाडी, सध्या रा. बदलापूर) याच्याविरुद्ध त्याचे वडील विजय रघुनाथ चिंदरकर ( वय वर्षे ८०, रा. कलमठ गावडेवाडी ) यांच्या फिर्यादीवरून कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ या कालावधीत कणकवली तसेच बदलापूर येथील विविध ठिकाणच्या एटीएममधून ही रक्कम काढण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, फिर्यादीच्या महाराष्ट्र बँक, कणकवली शाखेतील खात्यातून त्यांच्या मुलाने त्यांच्या परवानगीशिवाय एटीएमच्या माध्यमातून २ लाख ४९ हजार रुपये काढले. आपल्या संमतीशिवाय मुलाने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ही रक्कम काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
२२ ते २९ सप्टेंबरदरम्यान कणकवली तसेच बदलापूर परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या एटीएममधून ही रक्कम काढण्यात आली. याप्रकरणी फिर्यादीने कणकवली पोलिसांत तक्रार दिल्यानंतर रविंद्र चिंदरकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









