गणेशोत्सवापूर्वी शहरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही सुरू करण्याची मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याचा फटका आता नागरिकांच्या सुरक्षेला बसू लागला आहे. बसस्थानकात एसटी बसमध्ये चढताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ लंपास झाल्याच्या घटनेने शहरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठी गर्दी होणार असल्याने मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिके सुतार यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वैभववाडी शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. गुरुवारी वैभववाडी बसस्थानकात एसटी बसमध्ये चढताना एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ अज्ञात चोरट्याने लंपास केली. बसस्थानक परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असती, तर चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद होऊन संशयिताचा शोध घेणे पोलिसांना सोपे झाले असते. मात्र, सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांसमोर चोरट्याचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, उत्सवासाठी मुंबई, पुण्यासह विविध शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या मूळ गावी दाखल होणार आहेत. त्यामुळे वैभववाडी बाजारपेठ, बसस्थानक परिसर आणि शहरातील अन्य ठिकाणी मोठी गर्दी होणार आहे. गर्दीचा फायदा घेत चोरीसह अन्य अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
त्यामुळे बसस्थानक, बाजारपेठ, मुख्य चौक तसेच अन्य मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसवून ती तातडीने कार्यान्वित करण्याबाबत संबंधितांना सूचना नगरपंचायतीला द्याव्यात, अशी मागणी डी के सुतार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.












