फोंडाघाट (प्रतिनिधी) : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या रावे कार्यक्रमांतर्गत कृषी सम्राट गटामार्फत लोरे नं. २, वैभववाडी येथे कृषी माहिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायत लोरे नं. २ चे सरपंच श्री. विलास नावळे व युवा नेते श्री. सत्यजित रावराणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी ग्रामसेवक श्री. कस्तुरे यांनी ही उपस्थिती दर्शविली. शेतकरी व ग्रामस्थांना आधुनिक शेती, विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाची माहिती तसेच शासकीय कृषी सेवांविषयी अद्ययावत मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कृषी माहिती केंद्रामध्ये विद्यापीठाने विकसित केलेल्या ३३ भात वाणांचे नमुने, जैवखत उत्पादन विभागातील जैवखते, युरिया व डीएपी ब्रिकेट्स, कीड व रोग व्यवस्थापन, मृदा आरोग्य, सुधारित कृषी अवजारे, शासकीय कृषी योजना तसेच विविध पोस्टर्स, चार्ट्स व शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ. डी. एम. पवार सर यांनी उपस्थित शेतकरी व ग्रामस्थांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, विद्यापीठाच्या शिफारसी व शाश्वत शेती पद्धतींबाबत सविस्तर मार्गदर्शन करून कृषी माहिती केंद्राच्या उपयुक्ततेविषयी माहिती दिली.
या उपक्रमाचे आयोजन कृषी सम्राट गटाने कृषी संशोधन केंद्र, फोंडाघाट यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिक चौधरी, सिद्धांत शिंदे,करण बन्ने, रीशल मस्केरेन्हस, आर्यन सावळे, निखिल नागर, आदित्य प्रभुदेसाई, स्वयंभू प्रभुदेसाई, आशिम कुमार महंती व वेदांत घाग यांनी सक्रिय सहभाग घेतला











