“आमच्याकडे कोणी लक्ष देईल का ,? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाटवासीयांचा संतप्त सवाल !

ट्राफिक कोंडी, रिक्षा स्टॅन्ड, बेशिस्त पार्किंग, आणि पर्यटकांच्या असुविधाबद्दल बेपर्वाई– अशा अनेक प्रश्नांकडे संबंधितांचे अक्षम्य दुर्लक्ष

शांतता आणि सुव्यवस्थेची फोंडाघाट मध्ये सर्रास अरेरावीss पोलीस स्टेशनची ग्रामस्थांची मागणी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : चार दिवसांवर कोकणाचा प्रमुख सण, गणेशोत्सव आला असताना, जिल्हाधिकारी कार्यालयापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच विभाग सज्ज असल्याच्या घोषणांचा आणि योजनांचा, समित्यांचा दर दिवशी पाऊस पाडत आहे.मात्र कोल्हापूर, सिंधुदुर्ग,गोवा,कर्नाटकाच्या सीमेवरील “फोंडाघाट” गाव मात्र अनेक अडीअडचणी, असुविधा, शांतता आणि सुव्यवस्था,वाहतूक कोंडी, शेतकऱ्यांचा माकडांचा त्रास, अवैध धंद्याचा सुकाळ, मोकाट जनावरांचा प्रश्न, अरेरावीचा कळस याकडे जिल्हा प्रशासनाचे, लोकप्रतिनिधींचे, स्थानिक स्वायत्त संस्थांचे सदैव दुर्लक्ष होत आहे. अडचणी सोडवण्याच्या ठोस कार्यवाहीत सर्वच विभाग सुशेगात असल्याने. “— आता आमच्याकडे कोणी लक्ष देईल का ?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून दबक्या आवाजात विचारला जात आहे ….

फोंडाघाट हे सिंधुदुर्ग-कोल्हापूर वेशी वरील सुरक्षित घाट मार्गाचे गाव ! या देवगड- निपाणी राज्य मार्गावरून अगणित वाहतूक सुरू असते. येथूनच चिरे, वाळू, दगड, जनावरे यांचीही अवैद्य वाहतूक काहींच्या आर्थिक टक्केवारीतून आणि चेक पोस्ट आशीर्वादाने खुलेआम सुरू असते. यातूनच साईड देण्याच्या शुल्लक कारणावरून दादागिरी,मारामारीच्या घटना सुरू असतात. आणि कुणालाही खबर न देता त्या मिटवल्याही जातात. अवैध धंद्याचा सुकाळ बिंदिकत जुन्या नव्या पिढीला बरबाद करीत आहे. शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न, बेशिस्त पार्किंग आणि वाहतूक कोंडीमुळे रस्त्यावर चालणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. विना लायसन्स आणि भरधाव दुचाकी चालवणाऱ्या झेनझी ची सध्या चलती आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.याकडे लक्ष देण्यासाठी स्टाफ कमी असल्याचे सांगून, पोलीसच जागेवर नसतात आणि असलेच तर कामगिरीवर असतात. त्यामुळे लोकांनी पोलीस स्टेशनची मागणी केली आहे…

फॉरेस्ट ऑफिसरला निवेदन देऊनही माकडांच्या मरकटलीलानी होत असलेल्या, बागायती व्यापारी व शेतकऱ्यांच्या अपरिमित नुकसानीमुळे, सर्वच चिंतेत आहेत.पावसाने ओढ दिल्याने शेती संकटात आहे. शासनाने आंबा- काजूची अत्यल्प नुकसान भरपाई दिल्याने, तसेच २५/२६ ची एम. एम. आर. डी ची नुकसान भरपाई इकेवायसी करूनही अद्याप मिळालेली नाही. इ पिक चे एरर अजूनही मिटलेले नाहीत.रस्त्यावरील घाटापासून बाजारपेठेसह नांदगाव रोड पर्यंत ठेकेदार निखिल कन्स्ट्रक्शन ने पावसाचे कारण सांगून खड्डे बुजवलेले नाहीत.नवीन पुलाच्या बांधकामाचा त्रास अजूनही नागरिकांना भोगावा लागत आहे. फोंडाघाटच्या बहुसंख्य विभागात संबंधित अधिकाऱ्यांकडे दुसऱ्या गावाचा कारभार असल्याने, ग्रामस्थांना हेलपाटे घालावे लागत आहेत. त्याचा प्रचंड संताप व्यक्त होत आहे …

इतर घाटरस्ते, बांधकाम- आरोग्य -महसूल, शिक्षण (प्राथमिक) विभाग इत्यादी कडे जातीने लक्ष देत समन्वय साधणाऱ्या, धावून जाणाऱ्या जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी- लोकप्रतिनिधींना ” –आता तरी आमच्याकडे लक्ष देतील का ? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. येथील या सर्व समस्यांकडे सजग नागरिकांनीही आवाज उठवणे गरजेचे आहे अशी विचारधारा आता ऐकू येत आहे. त्यामुळे ” तिरा वरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाहीss संथ वाहते उगवाई ” ह्या संतापातून फोंडाघाट ग्रामस्थ आणि येणारी पिढी बाधित होण्याचा ची भीती व्यक्त होत आहे…

error: Content is protected !!