गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज

वैभववाडीत चार ठिकाणी आरोग्य पथके तैनात; सभापती सिद्धेश रावराणे यांच्याकडून पाहणी

वैभववाडी (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी मुंबई,पुण्यासह विविध शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी वैभववाडी तालुक्यात दाखल होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाची वैद्यकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्यातील रेल्वे स्टेशन, भुईबावडा चेक नाका, करुळ पोलीस तपासणी चेक नाका आणि वैभववाडी बसस्थानक या चार प्रमुख ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली आहेत. करुळ चेक नाक्यावर दाखल होणाऱ्या प्रवाशांची आवश्यक आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, पंचायत समितीचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी करुळ पोलीस तपासणी चेक नाक्याला भेट देऊन वैद्यकीय पथकाच्या कामकाजाची पाहणी केली.

गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना आवश्यक आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय मार्गदर्शन वेळेत मिळावे, याबाबत त्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांतून तालुक्यात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान कोणालाही आरोग्यविषयक त्रास उद्भवल्यास तत्काळ प्राथमिक उपचार व आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. चारही ठिकाणी तैनात असलेली वैद्यकीय पथके प्रवाशांच्या आरोग्य तपासणीसह आवश्यक मार्गदर्शन करीत आहेत.

यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती साची कोलते, करूळ सरपंच नरेंद्र कोलते, माजी उपसरपंच सचिन कोलते, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत गुरव, आरोग्यसेविका धनश्री देसाई, आरोग्यसेवक श्री.खाडे, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत सावंत, राहुल कनाके आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!