तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी मारली बाजी!

अंडर-१७ संघाच्या अंतिम सामन्यात शानदार विजय; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार झेप

खारेपाटण (प्रतिनिधी) : शेठ न. म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खारेपाटणच्या अंडर-१७ मुलींच्या कबड्डी संघाने कणकवली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत आपल्या दमदार खेळाची चुणूक दाखवत अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळविला. या शानदार कामगिरीमुळे खारेपाटणच्या कन्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

खारेपाटण हायस्कूलच्या या विद्यार्थिनी कबड्डी खेळात आपली चमक दाखवून यश संपादन केल्याबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे सचिव महेश कोळसुलकर व संस्थेचे सर्व विश्वस्त यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. तर या विजयी अंडर-१७ संघात कु.अनुष्का ज्ञानेश्वर गाडे, तेजस्वी प्रवीण मिसाळ, दिया दीपक तावडे, समृद्धी मोहन गाडे, मनाली बाबाजी साळवी, वेदिका अनिल पवार, सानवी दीपक धुरी, सिद्धी सचिन राऊत आणि साक्षी दिनकर घाग या विद्यार्थिनी खेळाडूंचा समावेश होता.

विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशामागे प्रशालेतील क्रीडा शिक्षक पाडवी सर व भिसे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी नियमित सराव, शिस्त, संघभावना आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले.

विजयी संघाचे प्रशालेच्या वतीने प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, एन. सी. सी. ऑफिसर कापसे सर आदी मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत जिल्हास्तरीय स्पर्धेतही खारेपाटणचे नाव उंचावावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. तालुकास्तरीय स्पर्धेतील या नेत्रदीपक विजयामुळे प्रशालेत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, “मैदान गाजवणाऱ्या खारेपाटणच्या कन्या आता जिल्ह्याच्या मैदानावरही विजयाचा झेंडा फडकविण्यास सज्ज झाल्या आहेत!”

विजयी संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

error: Content is protected !!