वैभववाडी (प्रतिनिधी) : मांगवली येथील कोकण विद्या प्रसारक मंडळ, मुंबई संचालित मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा ‘स्नेहमेळावा व सभा’ मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे.
या स्नेहमेळाव्यात शाळेच्या सर्वांगीण विकासाबाबत चर्चा, शाळेसमोरील अडचणी व त्यावरील उपाययोजनांबाबत विचारविनिमय, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन व शैक्षणिक प्रगती तसेच शाळेच्या भविष्यातील विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान व सहकार्य यावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करण्याबाबतही विचारविनिमय केला जाणार आहे.
‘मधुकर सिताराम भुर्के माध्यमिक विद्यालय ही आपली सर्वांचीच शाळा आहे. या शाळेने आपल्या सर्वांच्या संस्कार, ज्ञान आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दिली. त्यामुळे शाळेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊया,’ असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या स्नेहमेळाव्यास सर्व माजी विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे अध्यक्ष श्री. श्रीधर राणे, उपाध्यक्ष श्री. गजानन राणे, श्री. सतीश जागुष्टे, तसेच कार्यकारिणीतील पदाधिकारी व माजी विद्यार्थ्यांनी केले आहे.












