‘कुर्ला टू वेंगुर्ला’साठी उत्कृष्ट संगीताचा मान; बंटी खोत व मिलिंद माळकर यांच्या योगदानाचेही कौतुक
आचरा (प्रतिनिधी) : माळगाव बागायतच्या मातीतून संगीत क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले संगीतकार अक्षय खोत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटासाठी उत्कृष्ट संगीताचा पुरस्कार अक्षय खोत यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या या यशामुळे माळगाव बागायतसह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटाचे संगीत तसेच संपूर्ण पार्श्वसंगीत अक्षय खोत यांनी केले आहे. विशेष म्हणजे, कोविडच्या कठीण काळात बागायत येथे राहूनच त्यांनी या चित्रपटाच्या संपूर्ण पार्श्वसंगीताची निर्मिती पूर्ण केली. त्या काळात चित्रपटाची प्रोडक्शन टीमदेखील बागायत येथे येऊन संगीत ऐकण्यासाठी तसेच कामाची पाहणी करण्यासाठी येत होती. त्यामुळे या चित्रपटाच्या संगीतनिर्मितीच्या प्रवासात बागायतचेही एक विशेष स्थान निर्माण झाले आहे.
अक्षय खोत यांच्या या संगीतप्रवासात बागायतचे सुपुत्र बंटी खोत यांनी ढोलकी व पखवाज वादनाची, तर मिलिंद माळकर यांनी तबला वादनाची मोलाची साथ दिली. स्थानिक मातीतल्या या कलाकारांच्या वादनामुळे चित्रपटाच्या संगीताला अधिक समृद्धता लाभली. त्यामुळे अक्षय खोत यांच्या राज्यस्तरीय यशात बंटी खोत आणि मिलिंद माळकर यांचेही योगदान महत्त्वाचे असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
कोविडसारख्या प्रतिकूल परिस्थितीत बागायतमध्ये राहून साकारलेले हे संगीत आज महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेच्या राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित झाले आहे. ही बाब माळगाव बागायतसह संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची ठरली आहे.
ग्रामीण भागातून पुढे येत मुंबईसारख्या महानगरात आपल्या कलेची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या अक्षय खोत यांच्या या यशाने नव्या पिढीतील कलाकारांना प्रेरणा मिळाली आहे. माळगावच्या मातीतून उमललेली संगीताची प्रतिभा आता राज्याच्या कलाक्षेत्रात गौरविली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष आनंद व्यक्त होत आहे.
अक्षय खोत यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तसेच बंटी खोत आणि मिलिंद माळकर यांच्या मोलाच्या योगदानाबद्दल माळगाव बागायतसह संपूर्ण परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.











