श्रेयाची अप्रतिम कलाकृती पोचतेय जगाच्या कानाकोपऱ्यात

श्रेया चांदरकरने विविधरंगी धाग्यांपासून साकारली श्री स्वामी समर्थांची प्रतिमा

शाळकरी मुलीच्या अप्रतिम कलेचे सर्व स्तरातून होतेय कौतुक

चौके (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टाची इयत्ता नववीची विद्यार्थीनी तथा कलाशिक्षक प्रसिद्ध चित्रकार रांगोळीकार समीर चांदरकर यांची कन्या कुमारी श्रेया चांदरकर ही वडीलांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपार मेहनतीने आपल्यातील कलाही कमी वयातही जोपासत आहे. यापूर्वी काही दिवसांपुर्वी श्रेयाने १०० विविध रंगीत धाग्यांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची हुबेहूब प्रतिकृती साकारली होती तिचा व्हिडिओ सोशल मीडियावरुन जगभर पसरला होता. आणि त्याला पसंतीही मोठ्या प्रमाणावर मिळाली होती. त्या अफाट प्रतिसादाने प्रेरीत होऊन आता श्रेयाने श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा विविधरंगी धाग्यांपासून साकारली आहे. यासाठी तिने सात दिवस मेहनत घेतली असून दिवसरात्र एकाग्रतेने काम करून स्वामींची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. यासाठी श्रेयाला तिचे वडील तथा वराडकर हायस्कूल कट्टाचे कलाशिक्षक समीर चांदरकर आणि तिची आई शिक्षिका सिमरन चांदरकर यांचे विशेष सहकार्य लाभले. श्रेयाची कलेविषयी असलेली आवड आणि एकाग्रता यामुळे तिच्या हातून दिवसेंदिवस अप्रतिम कलाकृती साकारल्या जात आहेत. श्रेयाच्या या अप्रतिम कलाकृतीबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

error: Content is protected !!