जिल्हा परिषदेत उर्वरित पदांची भरती लवकरच पूर्ण करणार…

प्रमोद कामत; सावंतवाडीत रोजगार महाकुंभ मेळाव्याचे उत्साहात उद्घाटन..

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : राज्यातील तरुण वर्गाला रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना १५ दिवसांचे मोफत कौशल्य प्रशिक्षण देऊन सक्षम बनवणे, हाच ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र व इच्छुक तरुणांनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यभरात या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. ​पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २५ वर्षांच्या सामाजिक व राजकीय सेवेनिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा सप्ताह’ साजरा केला जात आहे. हा रोजगार मेळावा याच सेवा सप्ताहाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला असल्याचे प्रमोद कामत यांनी स्पष्ट केले.

यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, प्रतीक बांदेकर, जिल्हा रोजगार मेळावा समितीचे सदस्य अमोल टेंबकर, अमित नाईक, दिलीप भालेकर, उपप्राचार्य निलेश ठाकूर, सुचिता नाईक तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्री. कामत यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सुरू असलेल्या भरती प्रक्रियेचाही सविस्तर आढावा घेतला. मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एकूण २८४ जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील १०२ जागांची भरती यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, उर्वरित रिक्त जागांसाठीची भरती प्रक्रिया पुढील टप्प्यात लवकरच मार्गी लावली जाईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

​या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या माध्यमातून १० वी, १२ वी, पदवीधर तसेच एम.बी.ए. आणि बी.एड. अशा विविध शैक्षणिक पात्रताधारक तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या करिअरला नवी आणि योग्य दिशा द्यावी, असा विश्वासही प्रमोद कामत यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!