कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट-फोंडेकरवाडी येथील सूर्यकांत विठ्ठल फोंडेकर याचा लोखंडी रॉडने हल्ला करून खून केल्याप्रकरणी तसेच जातीवाचक शिवीगाळप्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी विष्णु यशवंत तळेकर उर्फ बंड्या (रा. गडगेसखलवाडी) याला मंगळवारी कणकवली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना रविवारी सायंकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास घडली होती. आरोपीने सूर्यकांत फोंडेकर यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला होता, ज्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सूर्यकांत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.कणकवली पोलिसांनी याप्रकरणी हत्येसह ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले होते. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, नेमके कोणत्या कारणावरून वाद होऊन हे कृत्य घडले, तसेच आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे, या बाबींचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद मान्य करत आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नायोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली पोलीस अधिक तपास करत आहेत.











