कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यात उद्भवलेली भीषण दुष्काळ परिस्थिती, शेतीचे झालेलं नुकसान, ‘ई-पीक नोंदणी आणि आगामी काळातील संभाव्य पाणी टंचाई या गंभीर विषयांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी जि. प.सदस्य संदेश सावंत यांनी सांगवे येथे नाटळ मतदार संघाची विशेष सभा आयोजित केली होती. सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीत नागरिकांनी व शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, ई-पीक पाहणीसह शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचवून प्रत्येक पीडित कुटुंबाला व शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास जि. प सदस्य संदेश सावंत यांनी यावेळी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील तालुक्यांचा ट्रिगर १ मध्ये समावेश केल्याने पालकमंत्री नामदार नितेश राणे तसेच खासदार नारायण राणे यांचे संदेश सावंत यांनी आभार मानले.
या बैठकीमध्ये दुष्काळ सदृश्य सद्यस्थितीचा सखोल आढावा घेण्यात आला असून, प्रशासनाने आणि नागरिकांनी तातडीने करावयाच्या उपायांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सभेत पुढील मुद्द्यांवर चर्चा करून त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
भात पीक नुकसान भरपाई : अवकाळी पाऊस किंवा इतर कारणांमुळे शेतकऱ्यांचे जे भात पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे, त्याचे तातडीने पंचनामे करून शासनाकडून लवकरात लवकर योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.
तातडीची उपाययोजना : कच्चे बंधारे बांधणे, नदीतील ओहळातील गाळ काढणे, दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करण्याबाबत बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशासन आणि नागरिकांचा समन्वय : आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व संबंधित विभागीय अधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन समन्वयाने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
ई-पीक नोंदणी : शेतकर्यांना शासकीय योजनांचा लाभ, पीक कर्जे व नुकसान भरपाई मिळण्यासाठी ‘ई-पीक पाहणी’ नोंदणी वेळेत व अचूक करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-पीक पाहणी केली नाही, त्यांनी तातडीने ती पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून शासनाच्या मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, असे निर्देश यावेळी देण्यात आले.
संभाव्य पाणी टंचाई निवारण : उन्हाळ्याची तीव्रता पाहता आगामी काळात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर आणि प्रशासकीय पातळीवर आतापासूनच योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
या आढावा सभेस नाटळ मतदार संघातील संजय सावंत सरपंच सांगवे, संतोष घाडीगावकर सरपंच दिगवळे, सुनील घाडीगावकर सरपंच नाटळ, गणपत सावंत सरपंच नरडवे, सानिका गावकर सरपंच दारीस्ते, विजया कांनडे, सरपंच कुंभवडे ग्रामपंचायत सदस्य, मंगेश माणगावकर उपविभागीय अधिकारी, भरसट, कृषी अधिकारी, आर एल शिंदे विस्तार अधिकारी, घुरसाळे, पाणीपुरवठा शाखा अभियंता, ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषि सहाय्यक तसेच यंत्रणांचे अधिकारी आणि मोठ्या संख्याने शेतकरी व नागरिक उपस्थित होते.












