हायवेच्या पुलाखालील भाजी-फळ विक्रेत्यांच्या पुनर्वसनात स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्या

भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सागर विलास राणे यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील हायवेच्या पुलाखाली व्यवसाय करणाऱ्या भाजी व फळ विक्रेत्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू असताना या जागांच्या वाटपामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कणकवली शहराध्यक्ष सागर विलास राणे यांनी कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी नगरसेवक स्वप्निल राणे ,शहर उपाध्यक्ष मंदार सोगम, सरचिटणीस मुन्ना परब ,जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे,चिटणीस गणेश तळगावकर,चिटणीस ऋतिक नलावडे उपस्थित होते.

कणकवली नगरपंचायतीतर्फे हायवेच्या पुलाखालील भाजी व फळ विक्रेत्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेत स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत असल्याच्या गंभीर तक्रारी भाजप युवा मोर्चाकडे प्राप्त झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नवीन जागांचे वाटप करताना कणकवलीतील स्थानिक मराठी भूमिपुत्रांना १०० टक्के प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी सागर राणे यांनी केली आहे. तसेच परप्रांतीयांना या ठिकाणी स्टॉल अथवा जागा देऊ नये. स्थानिकांच्या हक्काच्या रोजगारावर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास भाजप युवा मोर्चा तो खपवून घेणार नाही, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनात नगराध्यक्षांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांना पुनर्वसनाच्या नावाखाली अनेक स्टॉल अथवा जागा वाटप केल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्तीला मोठ्या प्रमाणावर जागा देण्याऐवजी तात्काळ धावपळ थांबवून प्रत्येक गरजू स्थानिक विक्रेत्याला एकच जागा देण्याची मागणी करण्यात आली आहे. एकाच व्यक्तीला बहुसंख्य जागा देणे ही चुकीची पद्धत असून त्यामुळे खऱ्या गरजू स्थानिक विक्रेत्यांवर अन्याय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
नगरपंचायतीने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पारदर्शक पद्धतीने आणि स्थानिक तरुणांच्या हिताचा विचार करून जागांचे वाटप करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीयांना किंवा विशिष्ट सत्ताधारी कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न झाल्यास भाजप युवा मोर्चाच्या वतीने नगरपंचायतीविरोधात तीव्र ‘स्थानिक हक्क आंदोलन’ छेडण्यात येईल, असा इशारा सागर राणे यांनी दिला आहे.स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न लक्षात घेऊन नगरपंचायतीने या प्रकरणात तातडीने योग्य निर्णय घ्यावा आणि पुनर्वसन प्रक्रियेत स्थानिकांना न्याय द्यावा, अशी मागणी सागर राणे यांनी केली आहे.

error: Content is protected !!