कुडाळच्या जुन्या कोर्ट जागेत ‘संभाजी महाराज संग्रहालय’ उभारा

सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी; ऐतिहासिक वारसा जतनासह पर्यटनवृद्धीचा उद्देश

ओरोस (प्रतिनिधी) : कुडाळ येथील सध्याचे न्यायालय अन्यत्र स्थलांतरित झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागेत छत्रपती संभाजी महाराजांचे जीवनचरित्र, पराक्रम आणि इतिहासाचे दर्शन घडविणारे संग्रहालय उभारावे, अशी मागणी सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्ट, कुडाळच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यासाठी शासनाने प्रशासकीय तसेच आर्थिक सहकार्य करावे, अशी विनंतीही ट्रस्टने केली आहे.

कुडाळ येथील सध्याचे न्यायालय स्थलांतरित झाल्यानंतर या वास्तूची जागा रिक्त होणार असल्याची माहिती मिळाल्याचे ट्रस्टने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या न्यायालयाच्या वास्तूला आणि सभोवतालच्या परिसराला ऐतिहासिक महत्त्व असल्याचेही ट्रस्टने नमूद केले आहे.

या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे वास्तव्य झाल्याचे ऐतिहासिक दाखले असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचे जतन करताना छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ त्यांचे संपूर्ण चरित्र, पराक्रम आणि कार्य पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारे संग्रहालय याच ठिकाणी उभारणे उचित ठरेल, अशी भूमिका ट्रस्टने मांडली आहे.

संग्रहालयाच्या माध्यमातून इतिहास अभ्यासक, विद्यार्थी तसेच पर्यटकांना छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य समजून घेण्याची संधी उपलब्ध होईल. त्याचबरोबर कुडाळच्या ऐतिहासिक महत्त्वाला नवी ओळख मिळून सिंधुदुर्गच्या पर्यटनालाही चालना मिळू शकते, असे निवेदनात म्हटले आहे.

जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू आणि वारसा जतन करणे काळाची गरज असून या प्रस्तावासाठी शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी ट्रस्टचे अध्यक्ष प्रसाद महादेव शिरसाट यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी राजन माडये, नितीन शिरसाट उपस्थित होते.

error: Content is protected !!