कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या कोकण झोन-४ अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला ज्युडो (Judo) स्पर्धा २०२६-२७ मध्ये शिक्षण प्रसारक मंडळ, कणकवली कॉलेजच्या विद्यार्थिनीने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.रिझवी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, बांद्रा यांच्या सहकार्याने मुंबई विद्यापीठाच्या स्पोर्ट्स पॅव्हेलियन, मरीन लाईन्स येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कणकवली कॉलेजची विद्यार्थिनी कु. तन्वी संतोष पारकर हिने महिला अंडर-४८ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळवून कांस्यपदक (Bronze Medal) पटकावले.
तन्वी पारकर हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. अनंत नागवेकर, सचिव विजयकुमार वळंजू आणि महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे यांनी तिचे विशेष कौतुक करून पुढील क्रीडा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच महाविद्यालयाचे जिमखाना प्रमुख प्रा. हेमंत गावित, जिमखाना समितीचे सर्व सदस्य, प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी तन्वी पारकर हिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
तन्वीच्या या यशामुळे कणकवली कॉलेजच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, तिच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.












