सावंतवाडी बसस्थानकातील १२ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड; जालना जिल्ह्यातून महिला आरोपी ताब्यात

सावंतवाडी पोलीस आणि एलसीबी सिंधुदुर्ग चा संयुक्त यशस्वी तपास

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी बसस्थानक येथे १२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका महिला आरोपीला जालना जिल्ह्यातील मंठा येथून ताब्यात घेतले.

सावंतवाडी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक २५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे २१ सप्टेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी CCTV फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरी करणाऱ्या महिलेची ओळख पटवली.
तपासात संगीता सुभाष जाधव (वय ३५, रा. संग्राम हॉटेलच्या मागे झोपडपट्टी, मंठा, जि. जालना) हिचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस पथकाने २९ सप्टेंबर रोजी मंठा येथे सापळा रचून तिला शिताफीने ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान संबंधित महिलेने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, चोरीस गेलेले सोन्याचे दागिने तिच्याकडून हस्तगत करण्याची कारवाई सुरू आहे. आरोपी महिलेला पुढील तपासासाठी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पीएसआय अनिल हाडळ, ए एस आय सुरेश राठोड, हवालदार जॅकसन घोन्साल्विस, कॉन्स्टेबल अमर कांडर तसेच सावंतवाडी पोलिस ठाण्याचे एपीआय हर्षद हिंगे, पीएसआय अविनाश पाटील, हवालदार शिंदे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल गावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

error: Content is protected !!