कणकवली (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार पंचायत समिती कणकवलीच्या वतीने सातरल, कासरल, वरवडे व पिसेकामते परिसरातील दुष्काळग्रस्त शेती पिकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पंचायत समिती कणकवलीच्या सभापती हर्षदा वाळके, उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, जिल्हा परिषद सदस्य सुप्रिया मेस्त्री, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी संबंधित गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेती पिकांची पाहणी केली. यावेळी यशवंत मेस्त्री, मोहन सावंत, सुनील सावंत, राजकुमार बोंद्रे, तुकाराम पालकर, सुहास राणे, जयवंत ठवसर व संतोष ठवसर या शेतकऱ्यांच्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी करून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
पावसाअभावी भातशेतीसह विविध पिकांवर झालेला परिणाम, पिकांची सद्यस्थिती तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी याबाबत संबंधित पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून माहिती घेतली. पाहणीदरम्यान दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्यावर भर देण्यात आला. यावेळी सातरल, कासरल, वरवडे व पिसेकामते गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच कृषी अधिकारी शशिकांत भरसट, कृषी विस्तार अधिकारी प्रमोद ठाकूर, कृषी सहाय्यक व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. या पाहणीमुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून, शेतीच्या नुकसानीबाबत आवश्यक कार्यवाहीसाठी अहवाल तयार करण्यात येणार आहे.












