पालकमंत्री नितेश राणेंच्या सूचनेनुसार दुष्काळसदृश्य परिस्थितीत भूजलस्तर वाढवण्यासाठी उपक्रम
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वरवडे गावात ट्रिगर वन च्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भूजलस्तर वाढविण्यासाठी तसेच भविष्यात पाण्याची उपलब्धता कायम राहावी, या उद्देशाने भाजप युवा मोर्चातर्फे बंधारा बांधण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात आला.
सध्या तालुक्यात अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे संवर्धन करून ते जमिनीत मुरविणे आणि भूजलपातळी वाढविणे गरजेचे आहे. याच उद्देशाने वरवडे येथे बंधारा बांधण्यात आला. या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असून परिसरातील विहिरी व इतर जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास हातभार लागणार आहे. या उपक्रमावेळी भाजपा जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे, माजी सरपंच आनंद घाडीगावकर, वरवडे शक्तीप्रमुख सदानंद चव्हाण, कणकवली शहर अध्यक्ष सागर राणे, सुभाष मालडकर, अमोल घाडीगावकर, मंदार मेस्त्री, रोहित ठाकूर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दुष्काळसदृश्य परिस्थितीत केवळ पाण्याची मागणी न करता उपलब्ध पाण्याचे संवर्धन, जलसंधारणाच्या उपाययोजना आणि भूजलपातळी वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. वरवडे येथे उभारण्यात आलेला हा बंधारा त्या दिशेने एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे.












