“समाजाला आर्थिक सक्षम करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट”- अरविंद वळंजू
खारेपाटण (प्रतिनिधी) : बौद्ध समाज केंद्रबिंदू ठेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन वर्षापूर्वी स्थापन झालेल्या तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सिंधुदुर्ग या मागासवर्गीय संस्थेची २ री वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार दि.३० सप्टेंबर २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जिल्हा मुख्यालय ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथील सभागृहात दुपारी २.३० वाजता संस्थेचे चेअरमन अरविंद वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली उस्ताहात संपन्न झाली.
यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष अरविंद वळंजू यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध समाजाच्या आर्थिक उन्नती करीता ही संस्था स्थापन करण्यात आली असून जिल्ह्यातील बौद्ध समजला आर्थिक सक्षम करणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तथागत नागरी सहकारी पतसंस्थेच्या २ ऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संस्थेचे अध्यक्ष अरविंद वळंजू, व्हाइस चेअरमन सूर्यकांत कदम, संस्थेचे संचालक – मोहन जाधव, रमेश कदम, मिलिंद जाधव, श्रध्दा सूर्यकांत कदम, रूपाली पेंडुरकर, मिलिंद सर्पे, सिद्धार्थ कदम, कांता जाधव, दिलीप जाधव प्रमोद कासले, तज्ञ संचालक भास्कर जाधव, सुबोध हिंदळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सभेच्या सुरवातील संस्थेच्या संचालिका श्रध्दा कदम यांनी भरतोय संविधानाच्या प्रस्ताविकाचे वाचन करून सभासदांना प्रतिज्ञा दिली. यानंतर संस्थेचे कार्यालक्षी संचालक तथा सचिव सुनील कदम यांनी वार्षिक सभेचा अजेंडा वाचून सभेला सुरुवात केली. गेल्या दोन वर्षात संस्थेने केलेल्या आर्थिक कार्य अहवालाचे सादरीकरण यावेळी सभासदापुढे मांडण्यात आले. यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेत सन २०२६ – २७ ते सन २०३० -३१ या पाच वर्षाच्या कालावधी निवडून आलेल्या नवीन संचालक पदाधिकाऱ्यांचे सभासदांचा वतीने अभिनंदन ठराव घेण्यात आला.
यावेळी झालेल्या चर्चेत पतसंस्थेच्या वतीने सभासदांना देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा ही पन्नास हजार एवढी तुटपुंजी असून ती एक लाख रुपये पर्यंत वाढवून देण्याची मागणी संतोष पाटणकर यांनी केली. या मागणीला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. तसेच संस्थेच्या सन २०२४ – २५ ते सन २०२५ – २६ या सलग दोन वर्षातील सभासदांना देण्यात येणारा लाभांश नफा न वाटता ती सर्व रक्कम संस्थेकडे जमा करण्याचा ठराव सभागृहात सर्वानुमते घेण्यात आला.
संस्थेची प्रगती ही तिचे किती संचालक प्रशिक्षित आहेत तसेच तिचे सर्व कर्मचारी व सभासद प्रशिक्षित आहेत यावर ठरत असते. त्यामुळे संचालक मंडळाने पतसंस्थेने वेळवेळी सहकार प्रशिक्षणे लावून सर्वांना आर्थिक साक्षर करणे काळाची गरज असल्याचे सेवानिवृत्त बँक अधिकारी डी. के पडेलकर यांनी सभेत सांगितले. तर या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी सहभाग घेत सभेचे कलाकाज सुरळीतपणे पार पाडले. या सभेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.












