UPI व्यवहारांवरील प्रस्तावित कराविरोधात पर्यटन क्षेत्राचाही एल्गार

‘नो UPI डे’ पाळण्याचे पर्यटन व्यावसायिकांना आवाहन :विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ

आचरा (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने ऑनलाइन UPI (Unified Payments Interface) व्यवहारांवर 0.04% कर आकारण्याचा प्रारूप निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ राज्यभरात असंतोष खवळला आहे. एका बाजूला भारतीय नागरिकांनी आणि छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन उभारलेली डिजिटल पेमेंटची क्रांती आज जागतिक स्तरावर भारताचा अभिमान ठरली आहे. अमेरिका आणि युरोपसारख्या अनेक विकसित देशांना जे सहजासहजी जमले नाही, ते भारताने चहाच्या टपरीपासून ते मोठ्या मॉल्सपर्यंत सर्वसामान्यांच्या सहभागातून करून दाखवले. मात्र, अशा या यशस्वी आणि लोकमान्य व्यवस्थेवर कर लादण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण व्यापारी आणि पर्यटन वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे.

या अन्यायकारक निर्णयाविरोधात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने उद्या म्हणजेच 2 ऑक्टोबर (गांधी जयंती) रोजी राज्यव्यापी ‘नो UPI डे’ आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला पर्यटन व्यावसायिक महासंघाने’ देखील पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उद्या सिंधुदुर्गातील व्यापारी आणि पर्यटन क्षेत्र एकत्र येऊन डिजिटल व्यवहारांना ‘ब्रेक’ द्यायला आहे.

आंदोलनामागची नेमकी पार्श्वभूमी व कारणे
केंद्राचा कर आणि जीएसटीचा बोजा आहे. केंद्र शासनाने ऑनलाइन UPI व्यवहारांवर 0.04% कर आकारण्याचा घाट घातला आहे. जरी हा कर वरकरणी नगण्य वाटत असला, तरी त्यावर जीएसटी (Goods and Services Tax) लागून हा भार प्रत्यक्षात 0.50% (अर्धा टक्का) पर्यंत वाढणार आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवर अन्यायकारक भार पडणार असून व्यापारी ग्राहकांना डिजिटल पेमेंटची सुविधा एक ‘सेवा’ म्हणून विनामूल्य उपलब्ध करून देतात. ग्राहकांकडून किंवा शासनाकडून कोणतीही सूट न मिळता या सेवेचा कर सरळ व्यावसायिकांच्या माथी मारणे अत्यंत चुकीचे असल्याचे पर्यटन महासंघाचे म्हणणे आहे.या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या शिखर व्यापारी संस्थेने केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावर 15 ऑक्टोबरपर्यंत योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाले असले, तरी तोडगा मिळेपर्यंत शासनाला पर्यटन व्यावसायिकांची एकजूट व ताकद दाखवून देणे गरजेचे असल्याने नियोजित आंदोलनावर सर्वा सोबत पर्यटन व्यवसायिक महासंघ आहे.

सिंधुदुर्ग हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा जिल्हा आहे. येथील हॉटेल मालक, रिसॉर्ट व्यावसायिक, होमस्टे चालक, वॉटर स्पोर्ट्स ऑपरेटर, हाऊसोट आणि ट्रॅव्हल एजंट्स मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन पेमेंटचा (QR कोड) वापर करतात. त्यामुळे व्यवसायाचे कोलमडणारे गणित होणार असून आधीच विविध करांचे ओझे सहन करणाऱ्या पर्यटन उद्योगावर हा नवीन कर म्हणजे व्यवसायाचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडवणारा ठरेल.
शासनाकडून ‘कॅशलेस इंडिया’चा नारा दिला जातो, आणि दुसरीकडे डिजिटल व्यवहारांवर कर लादून या प्रक्रियेलाच खीळ घातली जात असल्याबद्दल पर्यटन व्यावसायिकांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या आवाहनाला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी कंबर कसली आहे.
जिल्ह्यातील सर्व छोटे-मोठे व्यापारी, किराणा दुकाने, हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि पर्यटन केंद्र चालकांनी उद्या, 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या औचित्याने आपापल्या दुकानांवर व आस्थापनांवर UPI (QR कोड) सेवा तात्पुरती बंद ठेवावी.
पर्यटकांची गर्दी असण्याच्या दिवशी हा निर्णय घेणे कठीण असले, तरी भविष्यातील मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या समन्वयातून उभे राहिलेल्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या रक्षणासाठी सर्व व्यावसायिकांनी या आंदोलनात हिरिरीने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उद्याच्या एकादिवसीय लाक्षणिक आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, या तीव्र निषेधानंतर केंद्र सरकार 15 ऑक्टोबरच्या आत नेमका काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण व्यापारी आणि पर्यटन वर्गाचे लक्ष लागले आहे.अशी माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी दिली आहे.

error: Content is protected !!