मुंबई (प्रतिनिधी) : आयुष्यात यशाची कितीही मोठी शिखरे पादाक्रांत केली, तरी आपल्या मातीची आणि आजोळची नाळ कधीही तुटत नाही, याचाच प्रत्यय वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी गावात आला आहे. दिवंगत आई कै. विजया (माई) तावडे यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी तावडे भावंडांनी आपल्या आजोळी ज्येष्ठांसाठी ‘वात्सल्य वैभव आजी-आजोबा निवास’ आणि महाविद्यालयीन विद्यार्थीनींसाठी अद्ययावत वसतिगृह उभारण्याचा स्तुत्य संकल्प केला आहे,अशी माहिती खासदार तावडे यांचे मोठे बंधू विवेक तावडे यांनी बोलताना दिली.
विवेक तावडे हे एडगाव येथील त्यांच्या बहिणीच्या घरी मुक्कमी आले असता,तेव्हा त्यांनी या नियोजित वात्सल्य वैभव’ आजी-आजोबा निवास बाबत माहिती दिली.त्यांनी पुढे अधिक माहिती देताना सांगितले की ,सांगुळवाडी गाव हे आमचं आजोळ.आईची वडिलोर्पित जमीन या गावात आहे. कै.श्रीधर (आण्णा) तावडे हे आमचे वडील. त्यांच्या नावाने स्थापन केलेल्या “ग्रामविकास संस्थे’मार्फत साकारणाऱ्या या प्रकल्पामुळे ज्येष्ठांना हक्काची सावली आणि ग्रामीण विद्यार्थिनीसाठी एक हॉस्टेल येथे तयार होत असून त्यामुळे त्यांच्या पंखांना अभ्यासाचे नवे बळ मिळणार असून, हा प्रकल्प म्हणजे एका सुंदर स्वप्नाची पूर्तता ठरणार आहे,असे तावडे म्हणाले.
मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात भूमिपूजन
सांगुळवाडीतील या जमिनीत काही दिवसापूर्वी प्रार्थना, विधिवत जलपूजन आणि कोनशिला बसवून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली. या भावनिक सोहळ्याला खासदार विनोद तावडे, आमदार प्रमोद जठार यांसह सर्व तावडे भावंडे, कुटुंबीय आणि पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे, आजींच्या नावाने सुरू असलेल्या आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांनीही या सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत मोलाचे सहकार्य दर्शवले.कुटुंब आणि समाज एकत्र आल्याचा हा एक अविस्मरणीय दिवस ठरला होता.
कितीही मोठे झाले तरी आजोळच्या लाल मातीची आणि ‘सुख’ नदीची ओढ कायम !
खासदार विनोदजी तावडे हे राष्ट्रीय राजकारणात आणि सामाजिक क्षेत्रात कितीही मोठ्या पदावर पोहोचले, तरी ते आपले आजोळ असलेल्या सांगुळवाडीला कधीही विसरलेले नाहीत. बालपणीच्या गोड आठवणी आजही त्यांच्या मनात तितक्याच घट्ट रुजलेल्या आहेत. शाळेच्या सुट्टीत आजोळी आल्यावर सवंगड्यांसोबत मनसोक्त खेळणे, कोकणच्या लाल मातीत रमणे आणि गावातील ‘सुख’ नदीच्या डोहात पोहण्याचा आनंद लुटणे, हे क्षण त्यांनी आजही हृदयात जपून ठेवले आहेत. आपल्याला घडवणाऱ्या आजोळच्या मातीचे ऋण फेडण्याच्या कृतज्ञ भावनेतूनच या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.
३ एकर परिसर, एका वर्षाच्या पूर्ततेचे उद्दिष्ट
विनोदजींच्या संकल्पनेनुसार आम्ही या संकुलाला कधीही ‘वृद्धाश्रम’ म्हणणार नाही, तर हा ज्येष्ठांसाठी एक ‘मायेचा निवारा’ असेल. याच भावनेतून येथे खऱ्या अर्थाने ‘वात्सल्य वैभव’ साकारले जाईल,” असा विश्वास विवेक तावडे यांनी व्यक्त केला. सीएसआर निधी आणि तावडे भावंडांच्या संयुक्त प्रयत्नांतून ३ एकरच्या विस्तीर्ण जागेवर हे भव्य संकुल उभारले जात आहे. पुढील एका वर्षाच्या आत हे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या ५० ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची उत्तम सोय होणार असून, त्यासोबतच महाविद्यालयीन विद्यार्थीनींसाठी सुरक्षित आणि आरामदायी वसतिगृह उपलब्ध होणार आहे.
१०० टक्के पर्यावरणपूरक आणि आधुनिक सुविधांनी युक्त संकुल
कोकणच्या निसर्गाची काळजी घेत हे संपूर्ण संकुल १०० टक्के पर्यावरणपूरक ठेवले जाणार आहे.
विजेच्या गरजेसाठी येथे सोलर पॅनेल्स आणि पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल जनरेटर बसवला जाईल. स्वच्छतेसाठी शौचालयाला जोडलेला बायोगॅस प्रकल्प आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहे. याशिवाय पावसाचे पाणी साठवण्यासाठी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ आणि संपूर्ण परिसराभोवती हिरवेगार वृक्षारोपण करून निसर्गसंवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे.
ग्रामविकास संस्थेची ८ वर्षांतील भरीव कामगिरी आणि जलक्रांती
‘श्रीधर (आण्णा )तावडे ग्रामविकास संस्था’यांनी गेल्या ८ वर्षांत तावडे यांच्या खारेपाटण जवळील मूळ कुणकवण गावाचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला आहे. गावात ४७ बायोगॅस प्रकल्प आणि डिजिटल शाळेसह महिलांच्या लेझीम व ढोल-ताशा पथकातून त्यांना दरवर्षी उत्पन्न मिळवून दिले आहे. वालावलकर रुग्णालयाच्या सहकार्याने आरोग्य शिबिरे व कोविड लसीकरण राबवण्यात आले. तसेच १२ लाख रुपये खर्चून धरणावर पंप आणि कोरली-सातार्डी धरणातून थेट ६ कि.मी. लांबीची पाईपलाईन आणल्याने गावात कुळीथ, भाजीपाला व सूर्यफुलाची शेती बहरली आहे,अशी माहिती विवेक तावडे यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली.












