वैभववाडी (प्रतिनिधी) : मराठी साहित्यविश्वातील ज्येष्ठ कवी, कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या जीवनातील वेदना, संघर्ष तसेच सामान्य माणसाच्या भावविश्वाला आपल्या कवितेतून प्रभावीपणे व्यक्त करणारे वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, वैभववाडीच्या वतीने विशेष काव्यवाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १२.३० या वेळेत महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. नारायण सुर्वे यांच्या साहित्यिक योगदानाची ओळख नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्या प्रभावी काव्यलेखनातून सामाजिक वास्तव, कष्टकरी जीवन आणि सामान्य माणसाच्या संघर्षाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये काव्यवाचनाची आवड निर्माण होऊन साहित्याविषयी अभिरुची विकसित व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या साहित्यिक उपक्रमास वैभववाडी तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच सर्व निमंत्रित मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या काव्यवाचन कार्यक्रमामुळे कवी नारायण सुर्वे यांच्या साहित्यिक विचारांचा आणि काव्यपरंपरेचा जागर नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होणार आहे. कार्यक्रमास साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्थानिक समितीचे सचिव प्रमोद पुंडलिक रावराणे यांनी केले आहे.












